जालना : जिल्हा परिषदेच्या इमारतीत दुसर्या मजल्यावर कॉर्पोरेट झालेल्या माध्यमिक विभागाचे जुने रेकॉर्ड कार्यालयाबाहेरच अस्ताव्यस्त पडलेले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या कॉर्पोरेट दालनात गेल्या महिनाभरापासून या विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांना कार्पोरेट लूक दिला जात आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांची आसन व्यवस्था, टेबल यांची आकर्षक मांडणी या ठिकाणी केलेली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र विभाग कॉर्पोरेट झाल्यानंतर जुन्या कागदपत्रांना बेवारस सोडून न देता त्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश संबंधितांनी दिलेले आहेत. परंतु त्याचे पालनही होणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील सुमारे १० वर्षांपूर्वींची कागदपत्रे व जुने सामान दालनाबाहेरच ठेवण्यात आले आहे. यातील बर्याच संचिका अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. काही जीर्ण झालेल्या कागदपत्रांचाही त्यात समावेश असावा, असा अंदाज आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे, यासाठी प्रयत्न झाले नसल्याचे लक्षात येते. परंतु त्यामुळे महत्वाची कागदपत्रे गहाळ होण्याची किंवा फाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जबाबदारी कुणाची ? या जुन्या रेकॉर्डची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मात्र त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण हे रेकॉर्ड वाट्टेल तशा पद्धतीने टाकण्यात आलेले आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीत बरेच रेकॉर्ड जळाले होते. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात ई-फाईल करण्यात आली.जीर्ण झालेल्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करून तेही अद्ययावत करण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेतील ही जुनी कागदपत्रे अद्ययावत झाली का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जुने रेकॉर्ड बेवारस
By admin | Updated: May 14, 2014 00:41 IST