सिडकोतील सिंहगड कॉलनीतील प्रफुल्ल हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाने आणि चिकलठाणा एमआयडीसीतील बंद कंपनीत ३२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या वेगवेगळ्या घटना गुरुवारी सकाळी समोर आल्या. याविषयी सिडको आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिवाजी आसाराम कोथमिरे असे मयताचे नाव आहे. कोथमिरे यांनी आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच नातेवाइकानी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात हलविले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. शिवाजी हे एचएमटी कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही वर्षापासून आजारी होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपविले असावे, अशी प्राथमिक माहिती सिडको पोलिसांनी दिली.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मोरे स्पोर्ट्स या बंद पडलेल्या कंपनीत भाऊसाहेब मतकर (वय ३२, रा. नारेगाव परिसर) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.