कन्नड : येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष मानसिंग पवार व प्राचार्य विजय भोसले यांच्या विरुद्ध कन्नडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जितेंद्र गजेंद्र नरवडे, रा. कन्नड याने फिर्याद दिली की, विजय भोसले शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सन १९८६ ते ३१ डिसेंबर १९९६ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयाचे शिक्षक असताना देखील त्यांनी दि. २९ सप्टेंबर १९९४ ते ३१ डिसेंबर १९९६ या काळात त्याच संस्थेत वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरीवर असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करून एकाच वेळी एकाच संस्थेत दोन पदाचे एकूण १ लाख ६४ हजार ८७९ रु. एवढी रक्कम वेतन स्वरूपात घेऊन अपहार करून स्वत:च्या फायद्यासाठी वापरली.मानसिंग पवार यांनी विद्यापीठ निवड समितीचा सदस्य नसताना स्वत: अध्यक्ष असल्याचे भासवून स्वत: स्वाक्षरी करून आरोपी विजय भोसले यांची वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापक या पदासाठी शिफारस करून नियुक्ती केली. अशाप्रकारे विजय भोसले व मानसिंग पवार यांनी जाणीवपूर्वक शासनाची दिशाभूल व फसवणूक करून १ लाख ६४ हजार ८७९ रु.चा अपहार केला. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनि. सिद्दीकी करीत आहेत. (वार्ताहर)
अध्यक्ष व प्राचार्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा
By admin | Updated: August 8, 2014 01:24 IST