वसमत : येथील सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च झाला. मात्र हायमास्ट बंद, पाण्याची मोटार बंद, सभागृहाचा वापर नाही. बागेतील हिरवळ करपून गेली, असे चित्र आहे. तर इतर समाजाच्या स्मशानभूमी विकासासाठी निधी नसल्याने तेथे सुविधा नसल्याचे चित्र आहे. वसमत शहरात एक सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. तर विविध समाजाच्या स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला साधी संरक्षक भिंतही नाही. पाणी, वीज आदींचा तर प्रश्नच नाही. इतर समाजाच्या स्मशानभूमीचेही असेच चित्र आहे. वैकुंठधाम स्मशानभूमीत विकासावर खर्च मोठा झाला. या खर्चातून स्मशानभूमीचे रूप पालटले. पेवर ब्लॉक, उद्यान, हायमास्ट, प्रार्थनागृह, पाण्याची टाकी आदी सुविधा देण्यात आल्या. स्मशानभूमी सुशोभिकरणावर भर देण्यात आला. स्मशानभूमीच्या बागेत हिरवळही चांगली वाढली होती. परंतु आता पाण्याची मोटार बंद झाल्याने हिरवळ करपून गेली आहे. अल्पसंख्यांक निधीतून उभा केलेला हायमास्ट शोभेचा खांब म्हणून उभा आहे. बिल निघाल्यानंतर हायमास्टचा प्रकाशच पडला नाही. प्रार्थनागृहाचे बांधकाम झाले. मात्र दरवाजाला पट्ट्या लावून बंद केल्याने त्याचा वापर करता येत नाही. पाण्याची टाकी बांधली मात्र आजपर्यंत या टाकीत पाणीच पडले नाही. परिणामी, केलेल्या खर्चाचा फायदा अद्याप झालेला पहावयास मिळत नाही. केवळ गुत्तेदाराचे बिल काढण्यापुरतीच कामे होतात की काय? असा प्रश्न पडत आहे. झालेल्या खर्चातून वसमतची स्मशानभूमी एखाद्या गार्डनसारखी होणे अपेक्षित आहे. इतर स्मशानभूमीच्या तुलनेत वैकुंठधाम स्मशानभूमी व्यवस्थित आहे. उद्यानामुळे रमणीय झाली आहे. मात्र ज्या- ज्या सुविधेसाठी खर्च केल्या त्या सुविधांचा वापर पूर्णपणे होत नसल्याचे चित्र आहे.
अखेरच्या श्वासातही अडथळे!
By admin | Updated: December 16, 2015 23:11 IST