औरंगाबाद : राज्य शासनाने कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत मिनी लॉकडाऊनच लावला. ६ ते ३० एप्रिलपर्यंत हे कडक निर्बंध राहणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वाधिक फटका आठ तास काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांना बसला आहे. पहिल्याच दिवशी कामगारांना लॉकडाऊनचा हा चटका असह्य झाला होता. घराबाहेर पडले तर उन्हाचे प्रचंड चटके बसतात; पण हाताला कुठेच काम नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संध्याकाळी चूल कशी पेटवावी, असा प्रश्न कामगारांना पडला होता.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील महिनाभरात राजकीय मंडळींकडून लॉकडाऊनला कडाडून विरोध झाला. काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शासनाने स्वतःहून आठ दिवसांपूर्वी रद्द केले. शासनाने लॉकडाऊनऐवजी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देत बाकी सर्व दुकाने बंद करून टाकली. त्यामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कामगारांची प्रचंड कोंडी झाली. वॉशिंग सेंटर, कपड्याचे दुकान, सलून, हॉटेल, रेस्टॉरंट, हातगाड्या, किरकोळ विक्रेते अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. या कामगारांची संख्या हजारोंमध्ये आहे. मंगळवारी कामच नसल्याने त्यांना दिवसभराचा पगार तरी कोण देणार? सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठेतरी काम मिळेल का, या आशेने कामगार फिरताना दिसून आले. पंचवीस दिवस म्हणजे जवळपास एक महिना काढायचा तरी कसा, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला.
रेशनवरील २ रुपये किलोचे धान्य तरी द्यावे
शासनाने रेशनवरील दोन रुपये किलोचे धान्य तरी महिनाभर पुरेल एवढे द्यावे. त्यामुळे घरात दोन वेळेस चूल तरी पेटेल. दररोज २०० ते २५० रुपये रोजंदारीवर वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. मंगळवारी वॉशिंग सेंटर बंद असल्यामुळे छदामही मिळाला नाही.
मोहसीन शेख, पडेगाव