संजय कुलकर्णी , जालनाजालन्याचा मोसंबी ज्याप्रमाणे परराज्यात जातो, त्याचप्रमाणे डाळिंबाचा मालही आता परराज्यात जाण्याची सुविधा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात डाळिंबाच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाळिंब विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कारण जालन्यात डाळिंबाची मार्केट नाही. परिणामी डाळिंबाच्या विक्रीसाठी किमान शंभर डाळिंबाचे टेम्पो नाशिक, सोलापूर, मालेगाव येथील मार्केटमध्ये जातात. दूर अंतरावरील मार्केटमध्ये माल घेऊन जायचा म्हणजे तेथे डाळिंबांना अपेक्षित दर मिळावयास हवा. मात्र दरातील चढ-उतारामुळे नेहमी शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे नाही. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाहतुकीचे दरही वाढत आहेत. शिवाय वेळही जातो. परंतु शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन डाळिंब मार्केटची सोय उपलब्ध करून दिली आहे. या मार्केटमुळे आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दूर अंतरावरील मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. शिवाय जालना परिसरातील जिल्ह्यांमधील डाळिंबाचा मालही येथे विक्रीस येऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास दरही चांगला मिळू शकेल, असा विश्वास डाळिंब विक्रेत्यांमधून व्यक्त केला जात आहे. बाजार समितीमध्ये बीट हॉलसाठी एक मोठे शेड उभारण्यात आले आहे. याच ठिकाणी मोसंबी व डाळिंबाचे बीट लावले जाणार आहे. या शेडसाठी ६५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
आता डाळिंब परराज्यातील बाजारपेठेत
By admin | Updated: August 19, 2014 02:09 IST