नजीर शेख, औरंगाबादपीएच.डी.च्या बाजारप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तीन महिने चालढकल केल्यानंतर शुक्रवारी समिती नेमण्याची हालचाल सुरू केली. ‘लोकमत’मध्ये यासंबंधीचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एकदा जाहीर केलेली गोष्ट करायला पाहिजे, आपली प्रतिष्ठा गमावू नये, असे मत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी व्यक्त केले. विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अनेक गाईड असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांची आर्थिक छळवणूक करतात, यासंबंधी लोकमतने मार्च महिन्यात मालिका प्रसिद्ध केली होती. या विषयाचा ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. पीएच.डी.च्या घोटाळ्याप्रकरणी चार आजी, माजी कुलगुरूंची समिती नेमल्याचे जाहीर केले. या समितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली होती. याच विषयासंबंधी शुुक्रवारी अधिक माहिती घेतली असता विद्यापीठाने मागील तीन महिन्यांपासून समिती नेमल्याची पत्रे तयार करण्यातच वेळ घालवला. समितीत आता डॉ. साळुंके नसणार आहेत. त्याऐवजी अन्य एका माजी कुलगुरूंचा समावेश असणार आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. ही पत्रे आता सोमवारी (दि. १३ जून) रोजी पाठविली जाणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीएच.डी. घोटाळ्याप्रकरणी विद्यापीठाने तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वाया घालविल्याची प्रतिक्रिया माजी कुलगुरू डॉ. घुगे यांनी व्यक्त केली. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी असे सांगताना ते म्हणाले की, समितीमध्ये चार कुलगुरू हवेतच कशाला? चौकशी करायचीच असे ठरविले तर एका माजी कुलगुरूंकडूनही होऊ शकते. कुलगुरूंना त्यांची त्यांची कामे असू शकतात. शिवाय ते एकाच वेळी विद्यापीठात एकत्र येणेही अवघड असते. याचा विचार व्हायला हवा. कुलगुरूंनीही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करावी, असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ म्हणाले की, पीएच.डी.चे घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. कुलगुरूंनी अजूनही ज्या गाईडविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत, त्यासाठी कक्ष स्थापन करावा. विद्यापीठात संशोधनाचा दर्जा राहण्यासाठी चौकशी समिती आवश्यकच आहे. सत्यशोधन अहवालाचे काय?जालना येथील एका प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला रक्कम मागितल्यासंबंधी सादर झालेली ‘आॅडिओ क्लीप’ विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तपासली. त्यावर संबंधित प्राध्यापिकेचे मतही घेतले गेले. हा अहवाल समितीने कुलगुरूंना सादर केला. त्यावर क्लीपमधील आवाज त्या प्राध्यापिकेचाच असल्यासंबंधी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल घेण्याचे कुलगुरूंनी सूचित केले होते. मात्र, खालच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतीत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे सत्यशोधन समितीच्या त्या अहवालावर काहीच कारवाई झाली नाही आणि सत्यशोधन समितीतील प्राध्यापकांचाही वेळ वाया गेला.
चौकशी समितीसाठी आता पुन्हा हालचाली
By admin | Updated: June 12, 2016 00:02 IST