जालना : प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कार्यालयातील साहित्य जप्तीची कार्यवाही सुरूच आहे. बुधवारी लघुपाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीसह ९ खुर्च्या, १ झेरॉक्स मशीन, ४ संगणक, ३ सीपीयू, २ प्रिंटर असे साहित्य जप्त करण्यात आले. बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे सन २००४ मध्ये साठवण तलावाकरीता शेतकरी जयसिंग नंदराम सुंदर्डे यांची ४१ आर शेतजमीन शासनाने संपादित केली होती. त्यानंतर वाढीव मावेजा मिळण्यासाठी सुंदर्डे यांनी २००७ मध्ये दिवाणी न्यायालयात अॅड. आर.जे. बनकर व अॅड. राजेश वाघ यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल १ आॅगस्ट २०१२ रोजी लागला. सदर शेतकऱ्यास १ लाख ८० हजार रुपये व्याजासह मंजूर झाले आहेत. परंतु हा वाढीव मावेजा देण्यास संबंधित कार्यालयाने टाळाटाळ केली. या प्रकरणात दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर राजश्री परदेशी यांनी सदर कार्यालयातील जप्तीचे आदेश काढले. या आदेशानुसार लघुपाटबंधारे विभाग कार्यालयातील साहित्याची बुधवारी जप्ती करण्यात आली. कार्यकारी अभियंता यांची खुर्ची, झेरॉक्स मशीन, संगणक व इतर खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. शेतकरी जयसिंग सुंदर्डे, बेलिफ एन.ए. काळे, पी.एस. तिरमल, एल.के. सुंदर्डे, पी.एस. सरोदे, आर.आर. वैष्णव तसेच अॅड. आर.जे. बनकर, अॅड. राजेश वाघ, अॅड. एस.पी. हुसे, अॅड. अरविंद वायाळ हे उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच उपविभागीय कार्यालयात जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनासह कार्यालयातील खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. सात महिन्यांपूर्वी याच कार्यालयात जप्तीची कार्यवाही झाली होती. गेल्या दोन महिन्यात वाढीव मावेजाप्रकरणी केलेली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी गेलेले पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर परतले होते.