कळंब : तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथील भारत निर्माण योजनेसाठी विहिरीसाठी खरेदीखताद्वारे घेतलेली जागा व प्रत्यक्षात खोदकाम केलेली जागा यातील तफावत निष्पन्न झाल्याने संपादीत जमीन व कामातील रक्कमेतील वसूलपात्र रक्कम भरण्याबाबत समितीच्या अध्यक्ष, सचिवांना उपअभियंत्यांनी नोटिसा बजावल्या आहेत़ रकमेचा भरणा न केल्यास गुन्हे नोंदविण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ मस्सा खंडेश्वरी येथे भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे़ या योजनेतील उद्भव विहिरीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने कन्हेरवाडी येथील बळीराम कवडे यांच्या गट नं़ १३५ मधील ५ गुंठे जमीन एक लाख, ३ हजार रूपयांच्या मोबदल्यात खरेदीखताद्वारे घेतली होती़ तथापि या योजनेसाठी घेण्यात आलेली विहीर ही कोठावळवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात घेतल्याचे दिसून आले़ याबाबत कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा व पंचायत सिमतीचे विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली होती़ यावेळी खरेदी केलेल्या जमिनीवर विहीर नसल्याचे दिसून आले़ याबाबत कळंब पंचायत समितीने मार्च २०१३ मध्ये अहवाल सादर केला होता़ यावरून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी सदर विहिरीसाठी संपादनकरिता झालेला खर्च एक लाख व बांधकाम व खोदकामाचा खर्च ९ लाख, ८ हजार अशी ११ लाख, ११ हजार रूपये एवढी रक्कम वसूलपात्र ठरविली आहे़ ही रक्कम सात दिवसाच्या आत भरावी, अन्यथा शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा इशाराही समितीचे अध्यक्ष विक्रम वरपे, सचिव रामेश्वर इंगोले यांना दिलेल्या नोटीसीत दिला आहे़ (वार्ताहर)
‘भारत निर्माण’च्या अध्यक्ष, सचिवांना नोटिसा
By admin | Updated: May 18, 2014 00:49 IST