अहमदपूर : तालुक्यातील खडी केंद्र चालकांना शासनाच्या उपसंचालक बहुविज्ञान खाणीकर्म संचालनालय औरंगाबादच्या वतीने रॉयल्टीपोटी लाखो रूपयांची नोटीस दिल्याने तालुक्यातील खडी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, एवढा मोठा कर कशाने भरणार या चिंतेत खडी केंद्र चालक आहेत़ अहमदपूर शहरामध्ये दोन परवानाधारक खडी केंद्र तर अहमदपूर तालुक्यामध्ये १० खडी केंद्र असे एकूण १२ खडी केंद्र आहेत़ शासनाच्या औरंगाबाद खणीकर्म विभागामार्फत जानेवारी २०१४ मध्ये एका पथकामार्फत तालुक्यातील खडी केंद्र मालकांनी जमिनीचे उत्खनन केले आहे़ त्यात त्यांनी मशीनद्वारे मोजमाप करून अहवाल घेऊन गेले़ त्याचे चिकित्सकपणे अवलोकन करून दिलेल्या नोटीसीतील दंड खडीकेंद्र चालकाने त्वरित भरावा अन्यथा शासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़ शहरातील चंद्रकांत पढरीनाथ कोटावाड यांच्या खडी केंद्रात १० हजार ८७५ ब्रासचे उत्खनन करण्यात आले़ त्यापोटी शासनाने २१ लाख ७५ हजार रूपये, भाऊसाहेब बापूराव शेळके यांच्या खडी केंद्रात ८८० ब्रासचे उत्खनन झाल्याने त्यांना १ लाख ७६ हजार रूपये तर तालुक्यातील काळेगाव येथील परमेश्वर श्रीरंग जाधव यांच्या खडी केंद्रास २९ हजार ६८४ ब्रासचे उत्खनन झाले, असे दर्शवून त्यापोटी ५९ लाख ३६ हजार ८०० रूपये, चांगदेव निवृत्ती दहिफळे यांच्या किनगाव येथील खडी केंद्रांतर्गत ११ हजार ४७६ ब्रासचे उत्खनन करून त्यापोटी २२ लाख ९५ हजार २०० रूपये, प्रकाश वैैजनाथ फुलारी यांच्या आनंदवाडी येथील खडी केंद्रात १६ हजार १८० ब्रासचे उत्खनन करून ३२ लाख ३६ हजार रूपये, संजवनी मंचकराव पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील खडी केदं्रात १८८६ ब्रासचे उत्खनन झाले असून, त्यापोटी ३ लाख ७७ हजार २०० रूपये, आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील खडी केंद्रात ५ हजार ३१६ ब्रासचे उत्खनन झाले असून, त्यापोटी १० लाख ६३ हजार २०० रूपये, विवेक गोविंदराव मुंडे यांच्या किनगाव येथील खडी केंद्रात ३ हजार ११८ ब्रासच्या उत्खननापोटी ६ लाख २३ हजार ६०० रूपये, व्यंकटराव गुट्टे यांच्या खडी केंद्रात २ हजार ७८३ ब्राच्या उत्खननापोटी ५ लाख ५६ हजार ६०० रूपये, सुग्रीव मेकले यांच्या सोरा येथील खडी केंद्रात ४ हजार ७२३ ब्रासच्या उत्खननापोटी ९ लाख ४४ हजार ६०० रूपये, मगदूम पठाण यांच्या उजना येथील खडी केंद्रांतर्गत २३ हजार ९७ ब्रासचे उत्खनन झाले असून, त्यापोटी ४६ लाख १९ हजार रूपये, दिलीप मुंडे यांच्या किनगाव येथील खडी केंद्रांतर्गत २ हजार ४६२ ब्रासच्या उत्खननापोटी ४ लाख ९३ हजार रूपये भरण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आल्याने खडी केंद्र चालकांत खळबळ उडाली आहे़ (वार्ताहर) याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याशी संपर्क केला असता खडी केंद्र चालकांनी नोटिसी दिलेल्या कराचा भरणा त्वरित करावा़ तसेच आपल्याकडील जमा पावत्या दाखवून रॉयल्टी कमी करून घ्यावी़ सदरील नोटीसीचे उत्तर द्यावे, अन्यथा शासनाच्या वतीने पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़
खडी केंद्राच्या करापोटी चालकांना लाखो रूपयांच्या नोटिसा
By admin | Updated: May 21, 2014 00:16 IST