औरंगाबाद : गत सप्ताहात लोकमतने केलेल्या ग्रामीण आरोग्य सेवेच्या स्ंिटग आॅपरेशननंतर सार्वजनिक आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. याप्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटिसा पाठवून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. जिल्हा परिषदेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर सिव्हिल सर्जनच्या अधिपत्याखाली १० ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये चालविण्यात येतात. लोकमतने गत सप्ताहात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्ंिटग आॅपरेशन करण्यात आले. तेव्हा त्या रुग्णालयात कार्यरत असलेले बहुतेक सर्वच वैद्यकीय अधिकारी जवळच्या शहरात राहतात. तेथून ते नोकरीच्या ठिकाणी अप-डाऊन करीत असल्याचे समोर आले होते. तसेच अनेक डॉक्टर उशिरा येणे आणि लवकर निघून जाणे, अशा पद्धतीने वागतात. त्यामुळे या रुग्णालयांकडून जनतेला उपचार मिळत नसल्याचे समोर आले. याविषयी सविस्तर वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण यांनीही जिल्ह्यातील वरूड काझी, उंडणगाव आणि पालोद प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि करमाड ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. तेव्हा तेथे त्यांना वैद्यकीय अधिकारी भेटले नाही. करमाड ग्रामीण रुग्णालयाल सायंकाळी ६ वाजता सामसूम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यांनी अधिक चौकशी केली असता ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर औरंगाबादेत राहत असल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी सिव्हिल सर्जन यांना नोटीस पाठवून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. तसेच संबंधितांकडून खुलासा मागविण्याचे आदेश दिले. लोकमतच्या स्ंिटग आॅपरेशननंतरही त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
डीएचओ, सिव्हिल सर्जन यांना नोटिसा
By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST