औरंगाबाद : फारोळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात ३ जून रोजी दिवसभर वीजपुरवठा सुरळीत होता; पण महानगरपालिकेने भारनियमन होत असल्याचे कारण सांगून शहराला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची बातमी सर्वत्र पसरवली. मुळात महानगरपालिकेच्या यंत्रणेत दोष आहे; पण महावितरणवर खापर फोडले जात असल्याचा आरोप महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे, मनपाचे आयुक्त हर्षदीप कांबळे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता अजीनाथ सोन्ने, मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी जायकवाडी परिसर, फारोळा व ढोरकीन परिसराची पाहणी केली. यानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी (ग्रामीण विभाग) पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, आज दिवसभर औरंगाबाद ते पैठण रोडवर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे ढोरकीन पाणीपुरवठा योजनेच्या ३३ केव्हीच्या २९.५ किमी लांबीच्या वाहिनीवर अनेक ठिकाणी झाडे पडली होती. महावितरणने लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. या वाहिनीवरील झाडे हटवून फॉल्ट शोधले, खराब झालेले पिन इन्सुलेटर तात्काळ बदलण्यात आले. सदरील योजनेसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र वाहिनीचे काम करणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ३ जून रोजी जायकवाडी व फारोळा येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा अखंडित चालू होता. यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याचे कारणच नाही. मुळात महानगरपालिकेच्या जायकवाडी येथील पंपात किंवा पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झालेला असू शकतो. त्याकडे मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी १३२ केव्ही सबस्टेशनपासून ते औरंगाबाद पाणीपुरवठा योजना या ५ किमी लाईनचे पेट्रोलिंग करून पॉवर ट्रान्सफॉर्मर साईडला दोन पिन इन्सुलेटर व दोन डिस्क इन्सुलेटर पंक्चर झाल्याचे आढळले आले होते. ते लगेच बदलण्यात आले. याशिवाय पैठण नगरपालिकेचा पाणीपुरवठा योेजनेचा ट्रान्सफॉर्मरसुद्धा नादुरुस्त झालेला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
नियोजनशून्य कारभार मनपाचा, खापर मात्र महावितरणवर
By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST