घाटीत प्लाझा थेरपी बंद
गाईड लाईनची प्रतीक्षा : ४ महिन्यांत एका रुग्णाला प्लाझ्मा, त्याचाही मृत्यू
औरंगाबाद : कोरोना रुग्णाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीने एक नवीन उमेद जागविली होती. परंतु ही थेरपी रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याने घाटीत ही थेरपी बंद करण्यात आली. घाटीत ४ महिन्यांत अवघ्या एकाच रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आला.
‘आयसीएमआर’ने यापूर्वी बऱ्याच वेळा प्लाझ्मा थेरपीवर प्रश्न उपस्थित केले होते. घाटीत १३ ऑगस्ट रोजी एका ४८ वर्षीय रुग्णाला प्लाझ्मा देऊन या थेरपीची सुरुवात करण्यात आली होती. परंत त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पहिल्या रुग्णानंतर गेल्या ४ महिन्याच्या कालावधीत अन्य कोणत्याही रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आलेला नाही. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, सध्या ही थेरपी वापरली जात नाही. केवळ गंभीर रुग्णांसाठी ही थेरपी वापरण्याची सूचना होती. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या गाईड लाईनची प्रतीक्षा केली जात आहे.
घाटीत कोरोनातून बरे झालेल्या एका रुग्णाकडून एका वेळी ४०० मिलीलिटर प्लाझ्मा संकलन करता येते. यानुसार १२५ दात्यांकडून याचे संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी १३६ दात्यांबरोबर घाटीनेही संपर्क केला आहे. यात २४ दात्यांनी प्लाझ्मा दान केले होते. घाटीत प्लाझ्मा थेरपी बंद असताना चांगला उपचार असल्याचे सांगून खासगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यावर भर देण्यात आला.
इंजेक्शनचा झाला फायदा
घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी परिणामकारक ठरली नाही. त्यापेक्षा रेमडेसिवीर इंजेक्शनचा रुग्णांना अधिक फायदा झाला.