हणमंत गायकवाड ,लातूरतुमच्याकडे दोन नाणी असतील, तर एक नाण्याची भाकर घ्या अन् दुसऱ्या नाण्याचे पुस्तक घ्या़ भाकर तुम्हाला जगवेल, तर पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल, या डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने झपाटलेल्या एका तरुण पुस्तकवेड्या प्राध्यापकाच्या घरात हजार-दीड हजार नव्हे, तर तब्बल ८ हजार ग्रंथसंपदा ंआहे. त्याची किंमत १० लाखांवर असून, जे पुस्तक लातूरच्या कोणत्याच ग्रंथालयात मिळत नाही, ते पुस्तक नारनवरेंच्या लायब्ररीत हमखास मिळेल, अशी ओळखच या प्राध्यापकाची जिल्ह्यात आहे़ जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रा़डॉ़ अशोक नारनवरे या पुस्तकवेड्या आणि वाचनाचा व्यासंग असलेल्या प्राध्यापकाची ही कथा़़़औराद शहाजानी येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता असलेल्या प्रा.डॉ. अशोक नारनवरे यांना मिलिंद महाविद्यालय आणि नागसेन वनाचा स्पर्श झाला. नागसेन वनाच्या संस्कारामुळे वाचनाचा छंद जडला अन् ग्रंथसंचयाचं वेड लागलं. प्रारंभीच्या काळात मनोरंजनाच्या साहित्याचे कलेक्शन केले. पण आता मनोरंजनाचे साहित्य वाचायला नारनवरेंना वेळ नाही़ परिवर्तनवादी आणि प्रागतिक, फुले-शाहू-आंबेडकरी साहित्याचे मोठमोठे ग्रंथ नारनवरेंच्या घरात आहेत़ हे ग्रंथ घरात शोभा म्हणून ठेवले नाहीत, तर त्यांनी ते कोळून पेले आहेत़ इतिहास, प्राच्यविद्या, भारतातील विविध भाषेतील दलित साहित्य, विद्रोही साहित्य, रा.स्व. संघाचे संस्थापक गोळवणकर गुरुजी, गाडगेबाबा, स़ह़ देशपांडे, डॉ़ दामोदर कोसंबी, कॉ़शरद पाटील, डॉ. अ़ाह़साळुंके, डॉ. रावसाहेब कसबे यांचे समग्र साहित्य तसेच प्राच्यविद्येचे पंडीत प्ऱरा़देशमुख, ओमप्रकाश वाल्मिकी, बाबा आढाव आदी नामांकित लेखकांचे ग्रंथ प्रा़अशोक नारनवरे यांच्या घरात आहेत़ हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी, कानडी आदी भाषेतील ग्रंथसंपदाही त्यांच्याकडे आहे़ इतिहास व प्राच्यविद्येची पुस्तकं लातुरात नाहीत़ प्ऱरा़देशमुख लिखित ‘सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती’ हा आउट आॅफ प्रिंट झालेला ग्रंथही त्यांच्याकडे आहे़ लातुरातील सत्यशोधकी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ़ श्रीराम गुंदेकर यांना ‘दास शुद्रांची गुलामगिरी’ हा शरद पाटलांचा संदर्भासाठी ग्रंथ हवा होता़ लातूर शहरातील सर्व ग्रंथालयात डॉ़ गुंदेकरांनी तो शोधला, पण मिळाला नाही़ अखेर प्रा़डॉ़नारनवरेंकडे हा संदर्भग्रंथ त्यांना मिळाला़ डॉ़ गंगाधर पानतावणे, सुधीर रसाळ, प्रा. बा़ह़ कल्याणकर, प्रा़डॉ़अविनाश डोळस, नागनाथ कोतापल्ले, यु़म़पठाण यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य नारनवरेंना लाभले़ परिणामी, या प्रभुतींचा ग्रंथसंचय केवळ पहायला नाही, तर हाताळायला मिळाला. त्यामुळे ग्रंथ संचय आणि वाचनाचा छंद जडल्याचे नारनवरे म्हणतात़ पुस्तक वाचनामुळे माणूस घडतो आणि दुसऱ्यालाही घडवितो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे़ म्हणूनच त्यांच्याकडे व्हॉट्स अॅप, फेसबुक नाही़ केवळ पुस्तकं आहेत़ किरायाने घेतलेले दोन खोल्यांचे घर त्यांच्याकडे़ दोन्हीही खोल्या पुस्तकांनी भरलेल्या़ एका खोलीत आठ रॅक आणि आलमारी पुस्तकांनी तुडूंब भरलेली आहे. मराठी व शिक्षणशास्त्रात सेट-नेट, शिक्षणशास्त्रात पीएच.डी. आता मराठी विषयात डॉ़ गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे़ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ३५ शोधनिबंध त्यांनी सादर केले. पुस्तकाव्यतिरिक्त त्यांच्याकडे ८ नियतकालिके, ४ वर्तमानपत्रे येतात. वैचारिक संघर्ष करण्यासाठी विश्वव्यापी ग्रंथांचा संचय आणि वाचन हे नारनवरेंचे व्यसन आहे़
ग्रंथालयांत नाहीत; ते नारनवरेंच्या लायब्ररीत!
By admin | Updated: April 23, 2015 00:47 IST