औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवरील सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने ‘निर्भया फंडा’तून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत रेल्वेस्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर काही दिवसांपूर्वीच स्फोटासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर रेल्वेस्टेशनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच हे साहित्य सापडले. परंतु याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी नसल्याने नेमके हे साहित्य याठिकाणी आले कसे, याचा शोध घेण्यास अडचणी उभ्या राहिल्या. रेल्वेस्टेशनवर आजघडीला प्लॅटफॉर्म क्रमांक-१ आणि २ वर एकूण २६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. रेल्वेस्टेशनवरून दररोज २० हजारांवर प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरतात. स्फोटाचे साहित्य आढळून आल्याच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. ‘निर्भया फंडा’तून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
‘निर्भया फंडा’तून स्टेशनवर ‘सीसीटीव्ही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 00:03 IST