कळंब : शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त दर मिळून बाजारपेठेत होणारी लूट थांबावी, यासाठी शासनाने राबविलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या ससेहोलपटीच्या कथा अद्यापही सुरूच असून एकीकडे घातलेल्या मालाच्या पेमेंट संदर्भात जिल्ह्यात वादंग सुरू असतानाच कळंब येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या हमी भाव केंद्रावर जवळपास नऊशे क्विंटल हरभरा वजनाच्या प्रतीक्षेत पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला स्थिर व हमीभाव मिळावा, खुल्या बाजारात होणाऱ्या दरातील चढ उताराचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी राज्य शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर व हरभरा या धान्यासाठी तात्काळ हमीभाव केंद्र सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला. यामध्ये तुरीला ४३०० रुपये तर हरभऱ्याला ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला. या खरेदीसाठी नाफेड व जिल्हा मार्केटींग कार्यालयाच्या वतीने कळंब येथील तालुका खरेदी विक्री संघास हरभरा व तूर तर खामसवाडी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेस हरभरा खरेदी करण्यासाठी सब एजन्ट म्हणून नेमण्यात आले होते. कळंब शहरात सुरू करण्यात आलेल्या या केंद्रावर माल घालणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार विविध समस्यांना तोंड द्यावे लागले होते. कधी बारदाणा नाही तर कधी घेतलेला माल साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही...कधी वाढीव हमाली व वाहतुकीचा प्रश्न अशा या सतत समस्यांच्या गर्तेत असणाऱ्या खरेदी केंद्राचा खरेदी हंगाम संपला असला तरी घातलेल्या मालाचा दाम मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून ऐकावयास मिळत होती. यातच आता शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल मालाचे अजून वजनच झाले नसल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)त्यांच्या मालाचे तर वजनच नाही...एकीकडे माल घातलेले शेतकरी पेमेंटच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे या केंद्रावर ८५० क्विंटल हरभऱ्याचे वजनच झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हमी भाव केंद्र बंद होण्यापूर्वी आवक नोंदविली गेलेला हा हरभरा मोजलाच गेला नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सुरू असताना आवक नोंदलेला परंतु अद्यापही वजन न झालेला जवळपास ८५० क्विंटल हरभरा असून, यासंदर्भात वरिष्ठांना कळविले आहे. परंतु अद्याप कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. मात्र यासंदर्भात शेतकरी मात्र दररोज वजन करण्यासाठी खेटे घालत आहेत. - देविदास कावळेव्यवस्थापक, तालुका खरेदी विक्री संघ, कळंब
नऊशे क्विंटल हरभरा वजनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: July 5, 2014 00:40 IST