औरंगाबाद : कोकेन या मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी पुण्यातून शहरात आलेल्या एका नायजेरियन तरुणाला जवाहरनगर पोलिसांनी पाठलाग करून सेव्हन हिल परिसरात शुक्रवारी सायंकाळी पकडले. या तरुणाकडून ४.७२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या मादक पदार्थाची किंमत अंदाजे २५ हजार रुपये आहे.केडियो ख्रिस्तोफर (रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर हे शनिवारी सायंकाळी गस्तीवर असताना खबऱ्याने त्यांना माहिती दिली की, पुणे येथून एक नायजेरियन नागरिक औरंगाबादेत प्रतिबंधित मादक पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत आहे. सेंट फ्रान्सिस शाळेसमोर त्याने ग्राहकास बोलावले असल्याचे कळाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, माणिक बाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट फ्रान्सिस शाळेच्या परिसरात सापळा रचला. तेव्हा तेथे नायजेरियन तरुण केडियो हा काही वेळात दाखल झाला. यावेळी त्यास पकडण्यासाठी पोलीस त्याच्याजवळ जाऊ लागताच पोलिसांना पाहून तो सेव्हन हिल्सच्या दिशेने पळत सुटला. पोलिसांनी पाठलाग करून उड्डाणपुलाजवळ त्यास पकडले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४.७२ ग्रॅम कोकेन हे मादक पदार्थ आढळले. त्याच्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आहेर, घोडके, पोलीस कर्मचारी विनोद परदेशी, समाधान काळे, सुखदेव जाधव, माणिक हिवाळे, पांडुरंग तुपे यांनी सहभाग घेतला.
कोकेनची तस्करी करणाऱ्या नायजेरियन तरुणाला पकडले
By admin | Updated: October 29, 2016 00:55 IST