जालना : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरात छोट्या-मोठ्या चोरीसह लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सोमवारी विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे आदेश बजावले आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सोमवारी सदरबाजार, कदीम जालना, तालुका जालना या तीन पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांची अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सोमवारी संयुक्त बैठक बोलावली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, परीविक्षाधीन अधिकारी प्रियंका भगत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.संपूर्ण शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आहे. विशेषत: दिवसा ढवळ्यासुद्धा घरफोडीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून, गेल्या दीड-दोन महिन्यांतील या घटनांमुळे शहरवासिय दहशतीखाली आहेत. या पार्श्वभूमीवरच सिंह यांनी पोलिस निरीक्षकांसह फौजदारांची अक्षरश: झाडाझडती घेतली. आप-आपल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारीच्या घटनांची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे व अट्टल चोरट्यांसह दरोडेखोरांच्या विरोधात तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे, अशी सक्त सूचना बजावली. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांना तात्काळ पायबंद घालावा, असे सुनावून अधीक्षक सिंह यांनी त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग वाढवावी, दिवसासुद्धा फेरफटका मारून छोट्या-मोठ्या घटनांची नोंद घ्यावी, नागरिकांबरोबर सुसंवाद साधावा, व्यापाऱ्यांसह उद्योजकांबरोबर चर्चा करून समस्या जाणून घ्याव्यात, अशा सूचना दिल्या. या दीड-दोन महिन्यांत परिस्थिती नियंत्रणात आली पाहिजे, अशी सक्त सूचना त्यांनी बजावली आहे. नागरिकांनीही परिसरातील घटनांची माहिती पोलिसांच्या निदर्शनास तात्काळ आणून द्यावी, व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)गुन्हेगारीविरूद्ध मोहीम राबवागुन्हेगारीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली असून, संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी विविध घटनांतील कार्यपद्धती तपासावी, मागोवा घ्यावा व संबंधित आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, असे आदेश अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी दिले आहेत. तीनही पोलिस ठाण्यातील निरीक्षकांसह फौजदार व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये, तसे आढळून आल्यास, त्यांच्याविरोधात जिल्हा पोलिस यंत्रणा कठोर भूमिका घेईल, असा इशारा अधीक्षक सिंह यांनी दिला आहे. जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक बोलाविली. दीर्घकाळ चालेल्या या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरीक्षकांसह फौजदारांना अक्षरश: फैलावर घेतले होते. प्रत्येक घटनेत अधिकाऱ्यांनी ‘अपडेट’ असावे, असे वरिष्ठांनी सुनावले.
पोलिस निरीक्षकांची कानउघाडणी
By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST