बनोटी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला १५ तासानंतर ऐनवेळी पाचोरा (जि. जळगाव) येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातच रुग्णालयाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने संबंधितांची खूपच धावपळ उडाली. सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील पूजा समाधान माळी यांना गुरुवारी सकाळी प्रसूतीसाठी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्यामुळे आरोग्यसेवकानेच त्यांची तपासणी करून त्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रसूत होतील, असे सांगितले. मात्र तोपर्यंत त्या प्रसूत झाल्या नाहीत. तेव्हा रात्री ११ वाजता त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यातच रुग्णालयाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने अडचणीत आणखी भर पडली. त्यांना खाजगी गाडी करून पाचोर्याला जावे लागले. त्यामुळे आर्थिक फटका आणि मानसिक झळ सोसावी लागली. रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीसाठी ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत; पण अद्याप रुग्णवाहिका दुरुस्त करण्यात आलेली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात बर्याच वेळा डॉक्टर उपस्थित नसतात, त्यामुळे आरोग्यसेवकच रुग्णांना औषधी देतात. रुग्णालयाच्या अशा गैरव्यवस्थापनामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. (वार्ताहर)
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची हेळसांड
By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST