लातूर : परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़ सध्याचे शिक्षण हे कोरडवाहू शेतीप्रमाणे असल्याने त्यात कसलेच उत्पन्न निघणार नाही़ त्यामुळे पारंपरीक शिक्षणावर भर न देता आधुनिक शिक्षण ही काळाची गरज लक्षात घेवून दिले पाहिजेच, असे मत डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले़ विद्यापीठ अनुदान आयोग व जयक्रांती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे उद्घाटक म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ गोविंद घार हे होते़ डॉ़ नंदकुमार निकम, माजी प्राचार्य अनिरुध्द जाधव यांची उपस्थिती होती़ डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणामुळे होतो़ म्हणून विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून हा केंद्रबिंदू इतरत्र सरकता कामा नये म्हणून सूक्ष्म शिक्षण पध्दतीने शिक्षण देणे आवश्यक आहे़ कारण तुमच्याकडे असणारा वेळ, पैसा, विविध साधने, हे मर्यादित आहेत़ त्याचा वापर योग्य पध्दतीने म्हणजेच सूक्ष्म पध्दतीने करणे महत्वाचे आहे़ यासाठी प्राचार्यांची भूमिका एकाकी नाही़ हे लक्षात घेवून प्राचार्यांनी शैक्षणिक आव्हाने स्विकारावे, असेही ते म्हणाले़ यावेळी डॉ़ नंदकुमार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ तसेच प्रा़ गोविंद घार यांनी आपले विचार मांडले़ कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या डॉ. कुसूम पवार यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा़ गीता वाघमारे व प्रतीक्षा खटके यांनी केले़ (प्रतिनिधी)
आधुनिक शिक्षणाची गरज
By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST