नजीर शेख, औरंगाबादशहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच अपघात आणि आग, असे धोके लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनीच एकत्र येऊन ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार करायला हवी. स्वयंप्रेरित अशा किमान पाच हजार नागरिकांचा ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील प्रा. डॉ. पी. एस. वक्ते यांनी व्यक्त केले.‘माझ्या शहरात काय हवे’ यासंदर्भात डॉ. वक्तेयांनी आपल्या मुद्यांचे विश्लेषण करताना सांगितले की, आपल्या शहरात चांगल्या गोष्टी याव्यात याबाबत दुमत नाही. त्या येणे आवश्यकच आहे. या शहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी शेंद्रा येथे एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीचे वृत्त मी वर्तमानपत्रातून वाचले. महापालिकेचे अग्निशमन पथक किंवा इतर यंत्रणा तेथे पोहोचली. अशी यंत्रणा असली तरी येत्या काही काळात शहराचा होणारा विस्तार आपण लक्षात घेतला पाहिजे. विविध कंपन्या दाखल होतील. औद्योगिक क्षेत्रातील संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजेत. केवळ औद्योगिक क्षेत्रच नव्हे तर विविध प्रकारचे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काय संकटे येतील हे सांगता येत नाही. यासाठी आपल्या शहराची ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ असायला हवी. या टीममध्ये शहरातील युवक, युवती, महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त जवान, पोलीस, डॉक्टर्स, अभियंते, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, विविध तांत्रिक ज्ञान असणारी मंडळी, शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम क्षेत्रातील जाणकार, इलेक्ट्रिक, प्लम्बिंग आदी विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश असावा. या टीमची विभागणी आपल्याला शहराच्या विविध भागातही करता येऊ शकते. म्हणजे सेक्टरनिहाय ही टीम असू शकते. टीममधील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन, ई-मेल आणि ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असा डाटा जमा करता येऊ शकतो. सध्या मोबाईल, विविध अॅप्स, ई- मेल आणि संपर्काची विविध साधने निर्माण झाली आहेत. आपत्तीच्या प्रसंगी या साधनांचा वापर करून आवश्यक तितक्या लोकांना तेथे पाचारण करू शकतो. औद्योगिक क्षेत्रात तर प्रत्येक कंपनीनिहाय चार पाच व्यक्तींचा ग्रुप तयार करता येऊ शकतो. त्यातून औद्योगिक क्षेत्राचीही एक ‘डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार होऊ शकते.सुमारे पाच हजार नागरिकांचे आपत्ती निवारणासंबंधीचे प्रशिक्षणही व्हायला हवे. हे काम आव्हानात्मक आहे. परंतु सीएमआयएसारख्या किंवा इतर दोन-तीन संस्थांनी पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे. आपल्या शहराने आपल्याला खूप काही दिले. आपणही शहरासाठी काही करायला हवे, या जाणिवेतून ही आपत्ती निवारण टीम तयार करायला हवी.
शहराची आपत्ती निवारण व्यवस्थापन टीम हवी
By admin | Updated: August 31, 2014 00:42 IST