औरंगाबाद : पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया प्रशासनाने पारदर्शी पार पाडल्याची जाहिरात करणाऱ्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांनीच स्वत:सह पत्नीसाठी सोयीस्कर जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. ही पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया तर चक्क बसमध्ये रुमाल टाकून पकडलेल्या जागेची आठवण करून देत असल्याची टीका महिला शिक्षिकांनी केली आहे. शिक्षक संघटनांच्या विशिष्ट भूमिकेमुळे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नत्या कायम चर्चेचा व वादाचा विषय ठरत आहेत. ग्रामविकास खात्याच्या आदेशाने जिल्हा परिषदेत शिक्षक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पारदर्शी झाल्याची जाहिरात शिक्षक संघटनांतर्फे केली जात होती; परंतु या जाहिरातबाजीमागे लपलेले काळे सत्य जिल्हा परिषदेतील शिक्षिकांनी लिहिलेल्या अनावृत पत्राने उघड केले आहे. लोकमत प्रतिनिधीने यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, ‘रुमाल टाकून’ पकडलेल्या अनेक जागांचा खुलासा झाला. पदोन्नतीची ही प्रक्रिया एलसीडीवर रिक्त जागा दाखवून शिक्षकांचे समुपदेशन करून राबविली गेली. शिक्षकांनी पदोन्नती व पदस्थापनेची जागा स्वखुशीने स्वीकारलेली असते. त्यामुळे त्यांच्या पदस्थापनेच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ‘सदर जागा बदलून देता येणार नाही, अगर नाकारता येणार नाही.’ तरीही अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांच्या नेत्यांशी संगनमत करून अनेक जागा नाकारल्या किंवा परस्पर बदलून दिल्या. अशी झाली फसवणूकमुख्य रस्त्यावरील शाळेत नेमणुकीवर असलेल्या आणि पदोन्नतीच्या यादीत ज्येष्ठ असलेल्या काही शिक्षकांनी ही बनवाबनवी केली. त्यांना रिक्त जागांचा मोठा पर्याय होता. त्यांनी चांगल्या जागावर प्रारंभी नियुक्ती घेत ती जागा अडकवून टाकली. आपली पत्नी किंवा स्नेह्याचा क्रमांक येताच प्रारंभी नियुक्ती घेतलेली व्यक्ती प्रक्रिया स्थळी येऊन जागा स्वीकारण्यास नकार देत होती. मग सदर रिक्त जागेवर त्यांची पत्नी, पती किंवा स्नेह्याला नियुक्ती दिली जात होती.नकार देता येत नसताना अधिकाऱ्यांनी त्या नियुक्त्या रद्द कशा केल्या, सहमतीने व स्वखुशीने स्वीकारलेल्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी सदर व्यक्ती चालू प्रक्रियेत कशी येत होती, तिला आत कसे येऊ दिले जात होते. कारण इतर शिक्षकांना ही प्रक्रिया सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जात नव्हता. मग संबंधितांना सभागृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यान्वित होती, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रारंभी, नियुक्त्या स्वीकारून नंतर त्या रद्द करण्याचे किमान २५ ते ३० प्रकार घडले असून, त्या जागा शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, त्यांच्या पत्नी व स्वकीयांनी पटकावल्या आहेत. गोलवाडी, छावणी, अंजनडोह, पिसादेवी, शेंद्रा कमंगर, खामखेडा, काद्राबाद या शाळांतील जागांवरून जिल्हा परिषदेत चांगलाच खो-खोचा खेळ रंगला होता. हमरस्त्यावरील शेंद्रा कमंगर शाळेतील एका शिक्षिकेने काद्राबाद येथील शाळेतील नियुक्ती स्वीकारून जागा अडकवली. अंजनडोहच्या जागेवर रुमाल टाकून ती जागा धरून ठेवणाऱ्या शिक्षकाने अंजनडोहला मित्राला दिले. मग त्या शिक्षिकेचा काद्राबादला नकार आला व तेथे अंजनडोह मित्राला देणारे शिक्षक स्थानापन्न झाले. हा खेळ शिक्षणाधिकाऱ्यांना समजला नाही की, त्यांची त्याला मूकसंमती होती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिक्षिकांचे अनावृत पत्र शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या कर्तव्यनिष्ठ भूमिकेचा ‘चांगलाच’ आदर करून या शिक्षिका लिहितात, आपण अतिरिक्त ठरलेल्या ७५ मुख्याध्यापकांना सुरुवातीलाच माघार घ्यायला लावून आणि सर्वांत शेवटी खास माणसांना पुन्हा त्याच पदावर सुरक्षित पोहोचवून ‘आपला माणूस-आपला बाणा’ दाखवून दिलात. आरटीई अॅक्टनुसार घरी जाणारे मुख्याध्यापक आपल्या संपर्कात येताच त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला मुख्याध्यापकांना घाबरवून त्यांना स्वेच्छेने मुख्याध्यापक पदावरून माघार घेत पदवीधर व्हायला लावले आणि ‘भेटलेल्या’ मुख्याध्यापकांना सेफ झोनमध्ये आणले. बी.एसस्सी. शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारू नये, म्हणून बातम्या पेरल्या व नंतर त्याच जागेवर बी.ए. पदवीधारक आरामशीर पोहोचले, व्वा...
रुमाल टाकून पकडलेली जागा
By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST