नांदेड/नवीन नांदेड: काँग्रेस पक्ष वटवृक्ष असून त्याच्या सावलीतच नांदेड उत्तर व दक्षिण या दोन्ही मतदारसंघात पसरलेल्या प्रगतशील नांदेड शहराला राज्यातील टॉपटेन शहरात आणणार असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड उत्तर व दक्षिण मतदारसंघात झालेल्या प्रचारसभांमध्ये केले़ नांदेड उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डी़ पी़ सावंत यांच्या प्रचारार्थ तरोडा खु़ भागातील कॅनॉलरोड येथे तर दक्षिणचे उमेदवारी आ़ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासाठी सिडको भागात सभा घेण्यात आल्या़ महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती उमेश पवळे, विनायक सगर, संतोष पांडागळे, मंगेश कदम, गंगासागर आन्नेवार, सुनील राणे, विठ्ठल पावडे, सतीश देशमुख, अनिल पाटील, किशोर स्वामी, सुमती व्याहाळकर, दिलीप डांगे, महेश देशमुख तरोडेकर उपस्थित होते़ खा़ चव्हाण म्हणाले, नांदेड उत्तर मतदारसंघात डी़ पी़ सावंत यांनी मागील पाच वर्षात विकासाची कामे केली़ त्यांची आता परीक्षा आहे़ मतदार त्यांना नक्कीच पास करतील, यात कोणतीही शंका नाही़ अजुनही तरोड्याचा विकास बाकी आहे़ तो करायचा आहे़ यासाठी पुढील पाच वर्ष पुन्हा सावंत यांना द्यावी लागतील़ गतीने पुढे जायचे असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही़कालपर्यंत काँग्रेस पक्षात विविध पदे भोगलेले आता दुसऱ्या पक्षात स्वार्थासाठी गेले आहेत़ लोकसभेच्या निवडणुकीत जुना खासदार नको म्हणून जनतेने विरोध केला़ त्यामुळे मी उभा राहिलो़ यावेळी ४७ हजारांचे मताधिक्य देवून मला विजयी केले़ हे शक्य झाले ते केवळ तुमचा विश्वास, व तुमच्या प्रेमामुळे़ तर रात्री दक्षिण मतदारसंघातील सिडको भागात आ़ पोकर्णा यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली़ यावेळी खा़ चव्हाण म्हणाले, फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आम्ही गुजरात होवू देणार नाही़ काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देणारा पक्ष आहे़ महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासाची बांधिलकी काँग्रेसची आहे़ विकासाची ही पंरपरा पुढेही सुरु ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले़ या मतदारसंघात काँग्रेसची मते खराब करण्यासाठी विरोधकांकडून ४० - ४० उमेदवार उभे केले़ पंरतु माझा इतर कोणालाही नसून आ. पोकर्णा यांनाच पाठींबा असल्याचेही चव्हाण म्हणाले़ अजून निवडणुकीसाठी मतदानच व्हायचे असताना भाजपातील अनेकांना मात्र मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले़शासनाने अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत़ त्यामुळे मतदारांनी खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी राहावे असेही चव्हाण म्हणाले़ तत्पूर्वी आ़ पोकर्णा यांच्यासह अनेकांची भाषणे झाली़(प्रतिनिधी)
नांदेड शहर टॉपटेनमध्ये येणार
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST