जालना: जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, मंठा व जाफराबाद या चार तालुकास्थानच्या नगर पंचायतीच्या स्थापने संदर्भात मुदतीच्या आत एकही आक्षेप अर्ज दाखल न झाल्यामुळेच नगर पंचायती स्थापनचा मार्ग खुला झाला असून, लवकरच या नगर पंचायती अस्त्विात येतील, असा अंदाज आहे.जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, बदनापूर व जाफराबाद या चार तालुकास्थानच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्या संदर्भात राज्य सरकारने गेल्या चार महिन्यांपूर्वी निर्णय घेतला.पाठोपाठ प्रक्रिये सुद्धा सुरु केली. त्यातूनच ३० जूनपर्यंत आक्षेप हारकती किंवा सूचना मागविल्या होत्या. मात्र, चारही ठिकाणी या पंचायती स्थापने संदर्भात कोणताही गंभीर असा आक्षेप दाखल झाला नसल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळेच या नगर पंचायतींचा स्थापनेचा मार्ग खुला झाला आहे. गेल्या मे महिन्यातच संबंधित ग्रामपंचायतींनी नगर पंचायत स्थापनेसंदर्भात ठराव केले होते. शासन निर्णयाचे स्वागत सुद्धा केले. त्यामुळे या प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत हे स्पष्ट होते. नगर पंचायती स्थापनेमुळे त्या त्या ग्रामपंचायतींचा दर्जा वाढणार आहे. तसेच सरकारीपातळीवरील नगर पंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होण्याचा मार्गही खुला होणार आहे. परिणामी शहर विकासातील पाण्यासह अन्य मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)मंठा, घनसावंगी, बदनापूर व जाफराबादकर निर्णयाच्या प्रतीक्षेत २५ हजार लोकसंख्येचा पल्ला गाठणाऱ्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. त्या प्रक्रियेतच आणखी काही गावांचा समावेश करता येईल का, त्या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत अहवाल मागविला आहे. त्यामुळे अन्य काही गावाच्या ग्रामपंचायतींना भविष्यात नगर पंचायतीचा दर्जा बहाल करण्या संदर्भात हालचालींना सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत.विधान सभा निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांपूर्वीच या नगर पंचायती अस्तित्वात येतील अशी चिन्हे आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू होण्या पूर्वीच नगर पंचायती अस्तित्वा याव्यात म्हणून सरकारी पातळीवर जोरदार हलचाली सुरु आहेत. दरम्यान, जिल्हा महसूल प्रशासनाने या संदर्भात लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती दिली.
निवडणुकांपूर्वीच नगर पंचायती अस्तित्वात?
By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST