लातूर : लातूर तालुक्यातील अंकोली शिवारानजिक एका प्रेमीयुगुलाला मारहाण झाली होती. या प्रकरणी लातुरातील विविध संघटनांच्या महिला, युवक-युवतींनीमूक मोर्चा काढून निषेध नोंदविला. दयानंद महाविद्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत मूक रॅली काढण्यात आली. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. गनिमीकावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका तरुण-तरुणीला ३० नोव्हेंबर रोजी जबर मारहाण केली होती. हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, कायदा हातात घेणाराही आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या या घटनेचा महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी निषेध नोंदविला. मूक मोर्चाचे नेतृत्व अनुप महाजन, किरण सुनीता, तेजश्री बोंदर, ढालाईत आक्रम, राहुल थोरात यांनी केले. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेला मोर्चा आंबेडकर पार्क येथे विसर्जित झाला. यावेळी शिवाजी शिंदे, सुनीता आरळीकर, वैजनाथ कोरे, सुपर्णा जगताप, अजमेर शेख, दीपक हेंबाडे, पंचशिला डावखर, शहानवाज शेख, गजानन देशमुख, मारोती जाधव, बाळ सराफ, विश्वजित शिंदे, धनंजय शेळके, अर्चना नटवे, अजिंक्य अपसिंगेकर, राणी फड आदींनी मूक मोर्चात सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
लातुरात युवक-युवतींचा मूक मोर्चा
By admin | Updated: January 21, 2015 01:09 IST