औरंगाबाद : महापालिका सध्या ‘ड’ वर्गात आहे. येत्या काही महिन्यांत पालिका ‘क’ वर्गात यावी, यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. २०११ साली झालेली जनगणना, २०१५ साली होणार्या मनपा निवडणुकीसाठी होणार्या प्रभाग रचनेमुळे पालिकेचा वर्ग बदलण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. शहराचा विस्तार वाढला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांनी शहर वाढले आहे. त्या तुलनेत लोकसंख्यादेखील वाढली आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार शहरातील ९९ वॉर्डांची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. पालिकेचा प्रवर्ग बदलण्यासाठी भौगोलिक आणि लोकसंख्या परिमाण विचारात घेतले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तो निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. पालिकेचा फायदा काय ‘ड’ वर्गातून मनपा ‘क’ वर्गात आल्यास पालिकेला काही फायदे होणार आहेत. कर्मचारी भरतीची व काही वरिष्ठ संवर्गातील पदांची मान्यता मिळेल. आयुक्त हे पद सचिव दर्जाच्या अधिकार्याचे होईल. त्यामुळे विद्यमान आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे हेच आयुक्त राहण्याची शक्यता आहे. तसेच मनपाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने हद्दवाढ व मालमत्तांची पुन्हा पाहणी केली जाऊ शकते. १३०० कोटींची कामे मनपाद्वारे सुरू होतील. त्याचे मॉनिटरिंग करण्यासाठी आयुक्त हा सचिव दर्जाचा अधिकारी मिळेल. पालिकेचे नुकसान काय पालिकेला वित्त आयोगातून निधी मिळणार नाही. ‘ड’ वर्गातील मनपा व नगरपालिकांनाच निधी मिळतो. मनपाला स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतील. प्रशासकीय खर्चात वाढ होऊ शकते. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवावे लागेल. शासकीय अनुदानाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
पालिका ‘क’ वर्गात येणार
By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST