औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे होर्डिंग लावून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. यासंदर्भात एका जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला वारंवार निर्देश दिल्यानंतरही अनधिकृत होर्डिंग पुन्हा लागणार नाहीत यासंदर्भात पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरात झळकत असलेले तब्बल ६० अनधिकृत होर्डिंग मंगळवारी जप्त करण्यात आले.
खंडपीठाच्या निर्देशानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन वर्षांपूर्वी ठरावसुद्धा संमत करण्यात आला. शहरात ज्या ठिकाणी महापालिकेने अधिकृत होर्डिंग लावण्याची परवानगी दिलेली आहे, तेथे जयंती उत्सव आणि सणासाठी मुभा दिली. मात्र, या ठरावानुसार महापालिकेने एकही दिवस अंमलबजावणी केली नाही. आजही शहरातील प्रमुख चौकांमध्ये भाऊ, दादा गर्दी करीत आहेत. अनेक ठिकाणी तर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. मंगळवारी अचानक सकाळी ११ वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू केली. दिल्ली गेट, हर्सूल टी पॉईंट, आंबेडकर चौक, जळगाव रोड, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, रामनगर चौक, नाईक चौक, सेवन हिल चौक, आकाशवाणी, अमरप्रीत, क्रांती चौक, उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन, महावीर चौक, मध्यवर्ती बस स्थानक, भडकल गेट, आदी भागातील लहान-मोठे ६० होर्डिंग जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या होर्डिंग धारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. प्रशासनाकडून यापूर्वीही अनेकदा अशा पद्धतीने इशारा दिलेला आहे; मात्र अंमलबजावणी होत नाही.