औढा नागनाथ : संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ - हिंगोली येथील राज्य रस्त्यावर असलेल्या पिंपळदरी फाट्यावर शेतकऱ्यांनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे आ. डॉ. संतोष टारफे यांनी आंदोलनात सहभागी झाले होते. तर हिंगोली तालुक्यात माळहिवरा येथे सेनेने रास्ता रोको केला.औंढा- हिंगोली राज्य मार्गावरील पिंपळदरी येथे गुरूवारी दुपारी १२ वाजता विविध भागांतून आलेले शेतकरी जमा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेली तूरदाळ रस्त्यावर ओतून शासनाच्या शेतकरी धोरणांविषयीचा निषेध नोंदविला.जवळपास पावणेदोन वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनामुळे राज्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच औंढा येथे गुरूवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात मालाची विक्री करण्यासाठी आलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली.आंदोलनात काँग्रेसचे आ. डॉ. संतोष टारफे यांनी सहभाग नोंदवून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, रमेश जाधव, माणिक पाटील, सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, शंकर शेळके, शेतकरी माणिकराव करडिले, मारोती बेले, संतोष नाईक, दिग्विजय बायस, संदीप गोबाडे, अनिल सुरदूसे, गणेश देशमुख, कुंताबाई गोबाडे, ज.दि. इनामदार यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पो.नि.डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलनास राष्ट्रवादीचा पाठिंबापश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होत असलेल्या टाळे ठोको आंदोलनास हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्याअनुषंगाने येथील जिंतूर टी पाँर्इंटवर अर्धातास रास्तारोको आंदोलन करून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, तालुकाध्यक्ष संजय दराडे, गुलाम मूर्तिजा, शेख शकील, बाबूराव पोले, डॉ. हबीब, प्रवीण टोम्पे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला.यावेळी नांदेड-औरंगाबाद व औंढा - जिंतूर रस्त्यावरील तिन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
शेतकऱ्यांचे तीन ठिकाणी आंदोलन
By admin | Updated: June 8, 2017 23:51 IST