माजलगाव: आज घरातील आईमधील आई संपून तिची ‘मम्मा’ झाल्याने हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. टीव्हीच्या नादाने खुद्द आईलाच संस्कृतीचा विसर पडल्याने घराला घरपण राहिले नसून, आता धर्मसंस्कृती टिकविण्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांची आदरयुक्त भीती घरावर राहिली पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.माजलगाव येथे शनिवारी ‘नाती जपू या’ या विषयावर महिलांसाठी खास व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूरच्या अॅड. रामतीर्थकर यांनी उपस्थित हजारो महिलांना मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या, आई म्हणून कुटुंब प्रमुख आहे. दीर, भावजई, सासू, सासरे, नणंद, मुले ही सर्व नाते जपण्याचे काम आईचे आहे. परंतु आज टीव्हीमधील मालिकांचे वेड आईलाच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुटुंबाकडे तर दुर्लक्ष तर होतेच आहे. परंतु ती हिंदू संस्कृतीही विसरली असल्याची खंतही अॅड. अपर्णाताई यांनी व्यक्त केली. कपाळाला कुंकवाची टिकली, हातातील बांगड्या गायब झाल्या, अंगात टॉप व जीन्स आली आता तेच अनुकरण मुली करीत आहेत. आईच संस्कार विसरल्याने घरात घरपण राहिले नाही. संस्कृती बदलत चालल्याने येणाऱ्या काही वर्षात महिलांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल, अशी भीतीही त्यांनी उपस्थित महिला, पुरुषांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. आईने आपली संस्कृती जपून आपल्या मुलांवर व इतरांवर चांगले संस्कार कसे घडतील? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या व्याख्यानासाठी महिला, पुरुष, तरुण मुले-मुली यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रामतीर्थकर यांनी महिलांचे व्याख्यानातून प्रबोधन केले. (वार्ताहर)
‘आईला संस्कृतीचा विसर पडतोय’
By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST