भूम : मागील अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम नसल्यामुळे या तालुक्यातला बहुतांश शेतीचा माल खर्डा, बार्शीच्या बाजारपेठेत जात असल्याने आजही कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.तालुक्यातील ९६ गावे असून, हा तालुका रबीचा म्हणून ओळखला जातो. जवळपास रबीचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. येथील मुख्य पीक ज्वारी असून, ज्वारी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फार मोठी उलाढाल या तालुक्यात होते. असे असले तरी या कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून एकदाच आडत व्यापार भरतो. यामध्ये पाच-सहा व्यापारी असतात. त्यामुळे मालाचा लिलाव होत नाही. अशा परिस्थितीत येथील बहुतांश माल इतर बाजारपेठेत जातो. या बाजार समितीत रोज आडत व्यापार सुरु करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने थोडीफार आशा दाखविल्याने सध्या तालुक्यातून कापूस विक्रीसाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्री केंद्र नसल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री करावा लागत आहे. काही खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने कापसासाठी खरेदी-विक्री केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)४वाशी : तालुका निर्मितीनंतर २००३ साली येथे बाजार समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर तांदूळवाडी रोडलगत शासननियुक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चेडे यांनी आडत लाईन उभी केली. तेथे १२ गाळे उभारण्यात आले असले तरी आजघडीला या ठिकाणी केवळ ४ आडते शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करत आहेत. येथील आडतीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच होत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी हे कळंब किंवा बार्शी येथे आपला माल नेऊन विकत आहेत. लिलाव होत नसल्यामुळे येथील आडत दुकानादारही मालाची प्रत पाहून खरेदी करतात. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्यामुळे येथील आडत दुकानात शेतकरी माल आणत नाहीत. तसेच येथील आडत बाजारात सक्षम असा मोठा व्यापारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालावर उचल मिळत नाही. त्यामुळेही अनेक शेतकरी इतरत्र आपला माल नेत आहेत. आडत बाजारात शेतकऱ्यांना आवश्यक सुविधाही मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील आडत बाजार असून अडचण नसून खोळंबा असल्यासारखे आहे. तालुक्यात खरीप हंगामाची ३१ गावे असून, या गावांतून हायब्रीड, कापूस, मका, बाजरी आदी पिकाचे उत्पन्न घेण्यात येते. उत्पन्न बऱ्यापैकी येत असले तरी शेतकरी मात्र येथील आडतीला माल आणत नसल्याची खंत आडत दुकानदार नवनाथ कुंभार यांनी व्यक्त केली.
माल खरेदीसाठी चारच आडते बहुतांश माल खर्डा, बार्शीकडे
By admin | Updated: December 21, 2014 00:07 IST