उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीयांची बैठक झाली. मात्र निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी यात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. सर्व पक्षीय नेत्यांची या बैठकीत झालेली चर्चा पाहता, कुठल्याही एका प्रस्तावावर मतैक्य होत नसल्याने बहुतांश जणांचा ‘मूड’ निवडणूक लढण्याकडेच असल्याचे दिसून आले. विविध कारणामुळे मागील अनेक वर्षापासून जिल्हा बँक कमालीच्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. याची झळ सर्वसामान्य शेतकरी सभासदांना सोसावी लागू नये, तसेच सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका ‘लोकमत’ ने मांडली होती. प्रारंभी या दिशेने प्रवासही सुरू झाला होता. बैठकांचा सिलसिला पाहता निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र सोमवारी तुळजापूर आणि मंगळवारी सायंकाळी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहृावर झालेल्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रस्तावावर एकमत झाले नाही. मंगळवारी उस्मानाबादेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीकडून आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे यांच्यासह जीवनराव गोरे उपस्थित होते. शिवसेनेकडून पक्षनिरीक्षक गौरिष शानबाग, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, शिवाजी सावंत, माजी आ. ओम राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. काँग्रेसकडून आ. मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील तर भाजपाकडून जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि. प. सदस्य कैलास शिंदे, शिवाजीराव चालुक्य आणि दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. सोमवारी तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेत १०० कोटीची रक्कम ठेव म्हणून ठेवणाऱ्यास अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या अनुषंगाने मंगळवारी शिवसेनेच्या शिवाजी सावंत यांनी शंभर कोटीची ठेव ठेवण्याची तयारी दाखविली होती. बँक वाचविण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीने सर्वपक्षीयांसमोर ठेवलेल्या प्रस्तावात राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला ४ आणि सेना-भाजपाला ३ अशा जागा देण्याची तयारी दाखविली होती. त्यावर आणखी एक प्रस्ताव पुढे आला. भाजप-सेनेने ५ जागांची मागणी करीत उरलेल्या दहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्याव्यात, असे सांगितले. यावर काँग्रेसकडून काही प्रस्ताव येतो का? याची वाट पाहिली गेली. मात्र तसा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे समजते. आ. बसवराज पाटील बैठकीला नव्हते. त्यांच्याशी चर्चा करून बुधवारी सकाळी निर्णय घेऊ, असे काँग्रेसच्या उपस्थित नेत्यांनी बैठकीत सांगितले. एकूणच या सर्व घडामोडी पाहता आणि बुधवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग जटील झाला असून, बहुतांश पक्षाची वाटचाल निवडणूक लढण्याच्या दिशेनेच सुरू झाल्याचे मंगळवारी बैठकीनंतरचे चित्र दिसून येत होती. (प्रतिनिधी) ४जिल्हा बँक बिनविरोध काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असलो तरी आता अत्यल्प वेळ राहिलेला आहे. बँक बिनविरोध झालीतर आनंदच आहे. निवडणूक लागल्यास भाजपा पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. -नितीन काळे, जिल्हाध्यक्ष भाजपा.४मंगळवारी सकाळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तुळजापूर येथे झाली. यावेळी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र सायंकाळी झालेली बैठक सर्वपक्षीय नव्हती. या बैठकीत बिनविरोध काढण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याने उद्या दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास अंतिम निर्णय होणार आहे. काही इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. -अप्पासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेसस्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी सक्षम असतानाही बँकेचे हित लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. १०० कोटीच्या ठेवीचा प्रस्ताव होता. शिवसेनेने तशी तयारीही दाखविली. मात्र ठेवी देण्याबाबत ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नसल्याने चर्चा पुढे सरकली नाही. ठेवी उपलब्ध करून दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या काहीजणांचा राजीनामा घेण्याचीही आमची तयारी आहे. निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी आमचे सकारात्मक प्रयत्न सुरूच आहेत. - सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी ४जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी शिवाजी सावंत यांनी बँकेत शंभर कोटीची ठेव ठेवण्याची तयारी दाखविली मात्र मंगळवारच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. निवडणुकीच्या मुद्यावर यापूर्वी काँग्रेसबरोबर चर्चा झाली असून, बुधवारी सकाळी आम्ही पुन्हा काँग्रेसबरोबर चर्चा करणार आहोत. त्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल. - ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार, परंडा
‘मूड’ लढण्याचाच !
By admin | Updated: April 29, 2015 00:53 IST