अंबड : अंबड पाचोड रोडवरील पोलीस कॉलनी समोरील लिंबाच्या झाडाखाली अंदाजे सात महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास, बळीराम बबन बनकर या मिस्त्रीकाम करणाऱ्या युवकाला पाऊल रस्त्याने जाताना दगडाच्या आडोशाला ठेवलेले अर्भक रडण्याच्या आवाजामुळे दिसले. त्यांनी तात्काळ परिसरातील युवा कार्यकर्ता गोरख राऊत यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. तात्काळ नंदकुमार उढाण, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष राम लांडे, संजय कोल्हे, यांच्यासह काही मंडळी घटनास्थळी दाखल झाली. पोलीस प्रशासन व तहसीलदार अंबड, यांना घटनेची माहिती देताच तात्काळ प्रशासन कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दाखल झाले.या बालिका अर्भकाला तात्काळ शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. रूग्णालयात नायब तहसीलदार अमित पुरी, पेशकर, राष्ट्रवादी काँगे्रस ओबीसीचे तालुकाध्यक्ष बळीराम राऊत, मंडळ अधिकारी हरि गिरी दाखल झाले. यावेळी डॉ. एम. पी.वाकळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी.राजपूत, अधिकारी परिचारिका सीमा वाहेगावकर, कक्षसेवक एस.शेळके यांनी त्या बालिकेची तपासणी करून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.(वार्ताहर)
अंबड शहरात एक महिन्याचे अर्भक सापडले
By admin | Updated: July 12, 2014 01:16 IST