उस्मानाबाद : स्वस्तधान्य दुकानदार मापात फेरफार करीत मनमानी कारभार हाकत असल्याच्या निषेधार्थ नितळी (ता़उस्मानाबाद) ग्रामस्थांनी दुकानाला टाळे ठोकले़ तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी पंचनामा केल्यानंतर सदरील दुकानदाराने ‘मापात पाप’ केल्याचे समोर आले असून, मनमानी पध्दतीने कारभार करीत रेकॉर्डही अद्ययावत न ठेवल्याचे यावेळी दिसून आले. नितळी येथील स्वस्तधान्य दुकानदार ‘मापात पाप’ करीत लाभधारकांना साखरेसह इतर धान्याचा पुरवठा करीत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी दुकानाला टाळे ठोकले़ त्यानंतर तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी तक्रार दिली़ या तक्रारीनंतर मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी नितळी गाव गाठले़ त्यांनी ग्रामस्थांनी लावलेले कुलूप काढून वजनकाट्याची तपासणी केली असता २५० ग्रॅमची तफावत दिसून आली़ तसेच आलेली साखर संबंधित लाभधारकांना न वाटणे, ग्राहकांना पावती न देणे, ठरलेल्या भावापेक्षा १५ ते २० रूपये अधिक घेणे, एकाच व्यक्तीच्या अंगठ्याचे ठसे सर्वत्र घेणे, रेकॉर्ड नोंदी अद्यावत न ठेवणे आदी प्रकार समोर आले़ पंचनाम्यावेळी विश्वनाथ गवळी, रामभाऊ कोकाटे, रामेश्वर घारगे, दादा क्षीरसागर, अनिल जोगदंड, संतोष क्षीरसागर, भिमा रोकडे, कुंडलिक मुळे, रामा वरपे, बबन सुरवसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते़ मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असून, पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
नितळीत दुकानदाराकडून मापात पाप !
By admin | Updated: August 19, 2014 02:10 IST