वाळूज महानगर : वाळूज महानगरातील गरीब रुग्णांसाठी रेड स्वस्तिक सोसायटी व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत परिसरातील गरीब रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत.
उद्योग नगरीतील गरीब कामगारांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेड स्वस्तिक सोसायटी व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. गरीब कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची उपचारासाठी परवड होऊ नये, यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेतून फिरते रुग्णालय सुरू करून औद्योगिक परिसरातील रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर, तीसगाव, वळदगाव, वडगाव, साजापूर तसेच शहरातील पडेगाव, मिटमिटा, प्रज्ञानगर, भावसिंगपुरा आदी ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या फिरत्या रुग्णालयाचे उद्घाटन जानकीदेवी बजाज संस्थेचे सी. पी. त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रेड स्वस्तिक सोसायटी राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्यकारी संचालक तथा समन्वयक भगवान राऊत, राज्याध्यक्ष हेमंत गोरे, जिल्हाध्यक्ष के. बी. गवळी, मराठवाडा अध्यक्ष वाल्मीक सुरासे, संचालक बी. डी. चव्हाण, प्रशांत सारडा, जानकीदेवी बजाज संस्थेचे प्रमुख रणधीर पाटील, कार्यक्रमाधिकारी अनिता देशमुख, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, माजी सरपंच शेख अख्तर, माजी उपसरपंच महेंद्र खोतकर आदींची उपस्थिती होती. या फिरत्या रुग्णवाहिकेत डॉ. अमित उबाळे, डॉ. आदित्य अवस्थी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत. कार्यक्रमाला जानकीदेवी बजाज संस्थेच्या सुवर्णा इंगळे, ऐश्वर्या मोहिते, नंदकिशोर राऊत, संजय शिंदे, गणेश कुलकर्णी, सूरज बडोदे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- वाळूज महानगरात गरीब रुग्णांसाठी रेड स्वस्तिक सोसायटी व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फिरते रुग्णालय सुरू करून रुग्णांवर उपचार केले जात आहे.
फोटो क्रमांक- फिरते रुग्णालय