भोकरदन: तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची खळबळजनक घटना आव्हाना येथे घडली. विशेष म्हणजे हे कृत करणारे आरोपीही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगण्यात आले. आव्हाना येथील १३ वर्षीय मुलगी १६ मे रोजी शेजारच्या महिलेच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात तिला एकटी पाहून गावातील १५ ते १७ वर्ष वयोगटातील तिघे जण घरात घुसले. त्यातील एकाने तिला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. तर त्याच्या दोन साथीदारांनी मोबाईलद्वारे त्याचे चित्रीकरण केले. नंतर हा प्रकार कुणास सांगितल्यास तुला पळवून नेऊन जिवे मारून टाकू अशी धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी आठ दिवसानंतर सदर मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला घेऊन शनिवारी भोकरदन पोलिस ठाणे गाठले. तेथे सर्व हकीकत सांगितल्यानंतर मुलीच्या तक्रारी वरून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख, गुन्हे शाखेचे पोनि. अनंत कुलकर्णी, भोकरदन ठाण्याचे पोनि. राजेंद्रसिंह गौर , उपनि ज्योती मेढे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (वार्ताहर)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून चित्रीकरण केले
By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST