जालना : इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याने खरा इतिहास महाराष्ट्राला कळला नाही. म्हणूनच १६३० ते १६८० या काळातील इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे केली. यावेळी फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचा निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक समाज, रिपाइंसह विविध शिवपे्रमी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत ते बोलत होते. विचारपीठावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, सत्यशोधक अभ्यासिका प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. सय्यद महेबूब, सत्यशोधक समाजाचे कॉ. अण्णा सावंत, संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे, रिपाइंचे ब्रम्हानंद चव्हाण, किशोर चव्हाण, संतोष जेधे, राजेश राऊत, भरत मानकर, मिर्झा अन्वर बेग, फेरोज अली मौलाना, संजय देठे आदी उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातून केवळ वर्ण व जातीद्वेष पसरविण्याचे काम करण्यात आले. अशा विकृत लिखानाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आल्याने या लिखानालाच राजमान्यता मिळाली आहे. हा लोकभावनेचा अनादर असून, देवेंद्र फडणवीस हे मुसोलिनी आणि हिटलर असल्याची टीका त्यांनी केली. जो माणूस व्यवस्थेच्या विरोधात जाऊन कार्य करतो तोच इतिहास निर्माण करतो. मात्र, पुरंदरे यांनी बुद्धीप्रामाण्यवादी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ हिंदु धर्मापुरते मर्यादित ठेवले. हिंदु आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सरकारने राज्यातील मराठी माणसांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचा निषेध करुन राज्यातील प्रत्येक घरात विचारांची मशाल पेटविण्याचा निर्धार आव्हाड यांनी यावेळी केला. या प्रसंगी प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेला जवळपास ६०० शिवपे्रमी उपस्थित होते. परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी) बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी याला विरोध केला होता. यापूर्वी ब्राम्हण समाजातील अनेक व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आम्ही विरोध केला नाही. कारण आमचा विरोध कुठल्याही जातीला नसून, विकृत लिखानाला आहे. मात्र, पुरस्कार वितरणाच्या दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी दिली अन् राज यांनी पुरस्काराचा वाद पेटवत मराठाविरुद्ध ब्राम्हण असे पद्धतशीरपणे जातीद्वेषाचे राजकारण केल्याची टीका आव्हाड यांनी केली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जनाधार संपल्याने राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने जातीद्वेषाला खतपाणी घातल्याचा घणाघाती आरोप आ. आव्हाड यांनी यावेळी केला. परिषदेचे आयोजन कार्यालयातजालना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परिषदेला परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांच्या या भूमिकेने नगर परिषद प्रशासनानेही मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाची परवानगी नाकारली. अखेर संभाजी ब्रिगेड व सत्यशोधक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ही परिषद भाग्यनगरमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात घेतली. पोलीस अधीक्षकांवर आव्हाडांची टीकाशिवसन्मान परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विचार स्वातंत्र्यावरील घाला असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या कार्यपद्धतीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी टीका केली.
मध्ययुगीन इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात यावे - जितेंद्र आव्हाड
By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST