लातूर : काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी संस्थाचालकासह संबंधित आरोपींना कडक शासन करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात मातंग समाजातील विविध संघटनांसह आंबेडकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून शुक्रवारी सकाळी ११ वाजता महामोर्चा निघाला. मोर्चात महिला कार्यकर्त्या तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी बलात्कार केला होता. या अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला. याला संस्थाचालकही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात यावी, अशी मागणी महामोर्चाच्या वतीने करण्यात आली. खून करणाऱ्या गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा करावी, सानेगुरुजी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाने संगनमताने बलात्कार करून खून केला, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे. पीडित मुलीच्या पालकास २५ लाखांचा मदत निधी देण्यात यावा, मुलीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, अनुदानित सर्व निवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये होणारे शोषण थांबवून महिला अधीक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात, आश्रमशाळांना देण्यात येणाऱ्या निधीचा वापर योग्य होतो की नाही, याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या आश्रमशाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात व संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. निवासी आश्रमशाळेवर पोलिस नियंत्रण असावे. मुरुड येथील एका दलित मुलीवर झालेल्या बलात्काराची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक येथील मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे, सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महामोर्चात मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष जी.ए. गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव दिनकर मस्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, प्रा.डॉ. शिवाजी जवळगेकर, उपमहापौर कैलास कांबळे, रिपाइंचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, राज क्षीरसागर, दयानंद वाघमारे, संजय ओव्हळ, प्रा. अनंत लांडगे, मायाताई सोरटे, उत्तम चव्हाण, डॉ. लक्ष्मण मोहाळे, आनंद वैरागे, रामभाऊ चव्हाण, गोवर्धन मस्के, राहुल सरवदे, पिराजी साठे, डी.एन. वाघमारे, डी.डी. चव्हाण, योगेश उफाडे, विलास उफाडे, दयानंद शिंदे, सतीश क्षीरसागर, बन्सी वाघमारे, कैलास कांबळे, सुनील बसपुरे, गोवर्धन मस्के, नारायण कांबळे, ज्ञानोबा कांबळे, विनोद खटके आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
लातुरात मातंग समाजाचा महामोर्चा
By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST