लातूर : मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी गंजगोलाईतील बाजारपेठ फुलली होती़ महिलांच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असतो. त्यामुळे हळदी- कुंकू, चुडे, खण, तीळ-गुळ तसेच अन्य वाणांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली होती. गंजगोलाईतील कापड बाजारातही गर्दी झाली होती.गतवर्षीच्या तुलनेत काही वस्तूंच्या भावात वाढ तर काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत़ यंदा मकर संक्रांतीवर दुष्काळाचे सावटही दिसते. तरीही बाजारात गर्दी होती. शिवाजी चौक, विवेकानंद चौक तसेच भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेले वाण खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. लातूरच्या बाजारपेठेत हळदी-कुंकू २४० रूपये किलो होते. हळदी-कुंकवाची किरकोळ विक्री होती. १० रूपये छटाक, ६० रूपये पाव किलो दराने विक्री केली जात होती़ चुडे २० ते २५ रुपये जोडी होती़ तर २५ रुपये खण यात एक लोटकं, चार बोळके, झाकणी विकले जात होते़ उसाचे कांडे, हरभऱ्याची पेंडी, बोर १० रूपयास तर जांब, गाजर, खारकी बोराला ४० ते ६० रूपये किलोचा भाव होता़ तीळगुळ दोन प्रकारचे उपलब्ध असून लहान साखरेचे तीळगुळ २० रूपये छटाक, मोठे तीळगुळ ३० किलोचा दर होता. साधे तीळ हे १३० रूपये किलो तर गुळ २५ रूपये किलो आहे. तीळगुळाच्या रेवड्या २० रूपयास पुडा खरेदीसाठी शाळेतील मुलींची गर्दी होती़ वाणासाठी लागणारे साहित्याची खरेदी करण्यासाठी बुधवारी दिवसभर गर्दी होती. बांगड्यांच्या दुकानांतही बांगड्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)मकर संक्रांतीला वाण लुटण्याची प्रथा आहे. त्यामुळे गंजगोलाई, भुसार लाईन, भांडी गल्ली, शिवाजी चौक, विवेकानंद चौक, दयानंद कॉलेज गेट, भाजी मार्केट आदी भागांत वेगवेगळ्या प्रकारचे वाण विक्रीची दुकाने थाटली आहेत. दिवसभर या दुकानांत वाण खरेदीसाठी गर्दी होती.४मकर संक्रांतीनिमित्त प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून भेट देण्याचीही प्रथा रूढ झाली आहे. या वस्तू खरेदीसाठीही गर्दी होती. सौंदर्य प्रसाधने, हळदी- कुंकूचे दुकान, बांगड्यांसाठी दुकानांनी बुधवारी दिवसभर महिलांची गर्दी होती.
मकर संक्रांतीनिमित्त बाजार फुलला
By admin | Updated: January 15, 2015 00:11 IST