भोकरदन : तालुक्यातील कुकडी येथे विवाहितेला मारहाण करून विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मधुकर त्र्यंबक जाधव (रा़ राहेरा ता़ मोताळा जि़ बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी पार्वती अंकुश दळवी (वय २३ वर्ष) हिचा अंकुश दळवी सोबत तीन वर्षांपूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसानंतर मुलीस माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी १ लाख ५० हजार रूपये घेऊन ये, यासाठी तिला पती अंकुश वाळुबा दळवी, सासू मंजुळाबाई वाळुबा दळवी, सासरा वाळुबा विठोबा दळवी (रा सर्व कुकडी ता़ भोकरदन) तर नणंद रेखा दीपक शिंदे (रा़ झाल्टा ता़ औरंगाबाद) यांनी तिला मारहाण करून शारीरिक छळ केला. तसेच १९ मे रोजी पार्वती हिस जबर मारहाण करून विहिरीत ढकलून तिचा खुन केला असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून वरील चार आरोपींविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अंकुश दळवी, मंजुळाबाई दळवी, वाळुबा दळवी यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्योती मेढे ह्या तपास करीत आहेत़ दरम्यान, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
विहिरीत ढकलून विवाहितेचा खून
By admin | Updated: May 21, 2014 00:18 IST