उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत शेतकरी सहभागी झाले होते.जिल्हा बँकेकडून कोटयवधीची कर्जे घेतली. परंतु, त्याची परतफेड केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे कठिण झाले आहे. अशा बड्या थकबाकीदारांविरूद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याचा ठराव घेतला होता. परंतु, अद्याप एकाही मोठ्या थकबाकीदारांविरूद्ध बँकेकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. वारंवार मागणी करूनही बँकेकडून केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे. याच्याच निषेधार्थ मनसेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्याच्या हस्ते जिल्हा बँकेच्या गेटमध्ये नारळ फोडून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. हा मोर्चा जिल्हा बँक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. मोर्चामध्ये मनसे महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देशमुख, जिल्हा सचिव बंटी मंजुळे, शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे, उमरगा तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, परंडा शहराध्यक्ष सुदीप मोरे, उमरगा महिला आघाडी तालुकाध्यक्षा औटी, शिंदे, अझर शेख, काका गोरे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीवर मनसेचा मोर्चा
By admin | Updated: August 20, 2014 01:51 IST