माजलगाव/परळी : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी माजलगाव, परळीमध्ये धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चांनी शहरे दणाणून गेली़आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड व क्रीडामंत्री पद्माकर दळवी यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.माजलगावच्या मोर्चात शेकडो मेंढ्यामोर्चात सहभागी झालेल्या धनगर समाज बांधवांनी गळ्यात, डोक्याला पिवळे फेटे, हातात झेंडे घेतले होते. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चामध्ये शेकडो मेंढ्या आणण्यात आल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये भाजपचे भाई गंगाभीषण थावरे, आर.टी.देशमुख, अरूण राऊत, नितीन नाईकनवरे, डॉ. अशोक तिडके, तुकाराम येवले, बंडू खांडेकर, सोपान भाले, दत्ता येवले, सिद्धार्थ येवले, बबन सरवदे, डॉ. सदाशिव सरवदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तहसीलदार अरून जऱ्हाट यांना निवेदन दिले़‘आव्हान’चा पाठिंबाधनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आव्हान संघटनेनेही पाठिंबा दिला. अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे यांनी मोर्चात सहभाग नोंदवला. धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.परळीत सुंबरान मोर्चाआरक्षणासाठी येथील उप विभागीय कार्यालयावर सुंबरान मोर्चा काढण्यात आला़ आरक्षण संघर्ष कृती समितीचे माऊली गडदे, बाबासाहेब काळे, राजाभाऊ कोपनर, भीमराव सातपुते, दिलीप बीडगर, मुन्ना काळे, सतीष काळे, विनायक गडदे आदी सहभागी झाले़ आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले़ (वार्ताहर)
माजलगाव, परळीत धनगर समाजाचा मोर्चा
By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST