जालना : जादुच्या दुनियेत रमण्यासाठी आतूर झालेली मुले...स्टेजचा पडदा उघडला अन सर्वांची डायरेक्ट एन्ट्री झाली ती देशातील सुप्रसिद्ध जादुगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादुच्या दुनियेत. लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित कार्यक्रमात मुलांनी अनुभवली जितेंद्र यांची अदभूत जादू.शहरातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात कॅम्पस क्लब सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात जादुगार जितेंद्र यांनी प्रेक्षकांसमोर पत्त्यांचे खेळ, मिस्ट्रीयस सिलिंडर फ्रॉम सिंगापूर, झिगझॅम बॉय, डबल एक्सेज मिस्ट्री, द फ्लार्इंग बॉक्स असे एक ना अनेक जादुचे प्रयोग सादर केले. गिलोटीन हा जिवंत माणसाची मान कापणारा खेळ पाहून लहानांसोबत मोठेही अवाक झाले. तसेच द आर्म इल्युजन, इंडियन रोप ट्रीक हुड विथ हॅकर चीच, द ग्लास अॅण्ड बॉटल, ट्युब आॅफ इल्युजन अशा असंख्य जादुई प्रयोगांनी बच्चेकंपनींची मने जिंकली. समथिंग फ्रॉम नथिंग तसेच एका रुमालाचे दोन रुमाल करणे असे जादुचे प्रयोग यावेळी रंगले. कार्यक्रमाला अत्युच्च उंचीवर घेऊन जाणारा प्रयोग म्हणजे टेबलावर माणसाचे दोन तुकडे करणे. या कार्यक्रमास बच्चे कंपनींनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमास लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखाधिकारी मोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जादुई दुनियेत रमली लोकमत कॅम्पस क्लबची चिमणी पाखरं
By admin | Updated: April 20, 2016 23:21 IST