खुलताबाद : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर मयतांची नावे टाकून घेतली. तसेच दहा वर्षांपूर्वीचीच जुनी कामे झाल्याचे दाखवून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील झरी-वडगाव येथील ग्रामसेवक आर.बी. गुंजाळ यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी निलंबित केले असल्याने ग्रामसेवकांत एकच खळबळ उडाली आहे.आर.बी. गुंजाळ हे झरी-वडगाव ता. खुलताबाद येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना मग्रारोहयो ग्रामीण रोजगार योजनेच्या कामामध्ये शामसिंग हरसिंग, महेर, शिवराम रावजी मोरे, फुलचंद शिवराम चंदवाडे, कौसाबाई राऊत, कारभारी सर्जेराव गायकवाड, सुपडू गणपत गायकवाड या मयत मजुरांची नावे हजेरी पुस्तिकेत दाखवून रक्कम उचलली. तसेच हिराबाई संभाजी गोंडे, देवसिंग दौलत बोहरे, रामलाल तानाजी शिरे हे मजूर गाव सोडून बाहेरगावी गेले असूनही त्यांच्या नावे पगार काढलेला आहे. जी कामे पाच-दहा वर्षांपूर्वी झालेली आहेत तेच पुन्हा काम दाखवून भ्रष्टाचार केला. तसेच ९0 वर्षांवरील मजूर दाखवून वेतन उचलण्यात आले. त्याचबरोबर सध्या धामणगाव-रेल ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक गुंजाळ यांनी नमुना आठचे सन २000-२00१ च्या मूळ रेकॉर्डमधील संबंधित देवीदास बन्सी राठोड, शिवलाल धनाजी पवार, रा. धामणगाव तांडा यांच्या नावे असलेल्या नोंदी पान क्र. ५५ हे गायब केले. या कारणाने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपिल १९६४ नियम (३) मधील तरतुदीनुसार गुंजाळ यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्यात आले. (वार्ताहर)
मग्रारोहयोत अपहार; ग्रामसेवक निलंबित
By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST