औरंगाबाद : भगवंतांच्या स्तुतीपर भक्तिगीत व लोरीने भगवान महावीरांच्या जन्मोत्सव सोहळ्यात भाविक हरखून गेले होते. केशरबाग मंगल कार्यालयात श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वर म.सा. यांच्या सान्निध्यात आयोजित धार्मिक सोहळा अविस्मरणीय ठरला. गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघाच्या वतीने सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयात पर्युषण महापर्वचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत महावीर भगवान यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.तत्पूर्वी, सकाळी केशरबाग मंगल कार्यालय येथे श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वर म.सा. यांच्या सान्निध्यात चौदा स्वप्ने आणि पाळणाजीचे विविध चढावे यांच्यासह सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. दीपक करणपुरिया यांनी आज आपल्या हळुवार लोरींनी, भगवंत स्तुतीपर गीतांनी उपस्थितांना वेगळ्याच विश्वात नेले.‘लल्ला लल्ला लोरी’, ‘एक जन्मा राजदुलारा’, ‘धीरे धीरे मीठा गीत सुनाये’, ‘कभी वीर बन के महावीर बन के चले आओ’, ‘एक बार आओ दाता बन के’, ‘पलके हम बिछायेंगे जिस दिन मेरे प्रभुवर घर आयोगे’ अशी एकापेक्षा एक सुंदर परंतु हळुवार गीते त्यांनी सादर केली. भाविकांचा उत्साह पाहून त्यांनी ‘श्री शंखेश्वर पार्श्वनाथ की जय’ असा जयघोष सुरू केल्याबरोबर अनेकांनी त्यात नृत्यासह सहभाग घेतला.
भक्तिगीताने रंगला भगवान महावीर जन्मोत्सव सोहळा
By admin | Updated: August 28, 2014 00:22 IST