लाॅकडाऊन वर्षपूर्ती : भयंकर अशा शुकशुकाटाचे ‘ते’ दिवस, उद्योग, व्यवसायांवर परिणाम, ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षणाची नवी सुरुवातही
औरंगाबाद : दिवसा उजेडी भयंकर असा शुकशुकाट... सुरुवातीचे काही दिवस घराघरांत आनंदाचे अन् नंतर चिंतेचे भंडार... उद्योग, व्यवसाय ठप्प, बेरोजगारीचे संकट, उदरनिर्वाहाचा प्रश्न... पण सोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द, एकमेकांना मदतीचा हात... ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षण अशी नवी सुरुवात... एक ना अनेक अशा चांगल्या, वाईट गोष्टींचा अनुभव आणि त्यातून सावरण्याचा धडा लाॅकडाऊनने औरंगाबादकरांना शिकविला. २२ मार्च, २०२० रोजी जनता कर्फ्यू, त्याच्या दुसऱ्याच दिवशी २३ मार्चपासून राज्यातील नागरी भागात कलम १४४ आणि २५ मार्चपासून देशभर लाॅकडाऊन लावण्यात आला. लाॅकडाऊनने औरंगाबादकरांच्या स्मृतीत कायमचे घर केले. या काळात ‘न भूतो’ अशी कोरोना बंदी म्हणजेच लाॅकडाऊन सर्वसामान्यांनी अनुभवली.
जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना महामारीने देशात, राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. आजपर्यंत कधीही पाहिला नसेल, असा बंद म्हणा, संचारबंदी म्हणा की कर्फ्यू, या लाॅकडाऊनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. काहींवर क्षणिक, तर काहींवर दूरगामी परिणाम झाला, परंतु सगळ्यांतून सावरत कोरोनाशी दोन हात करत औरंगाबादकरांनी पुढे पाऊल टाकणे सुरू केले. ‘मिशन बिगिन अगेन’ने जनजीवन सुरळीत झाले, परंतु कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले. परिणामी, आता पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ ओढावली.
——-
१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या दिवशी कोरोनाच्या अरिष्टाला हद्दपार करण्यासाठी औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्या, थाळ्यांसह शंखनाद करत डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणेप्रती नागरिकांनी सद्भावना व्यक्त केली.
२) जनता कर्फ्यूच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २२ मार्च रोजी मध्यरात्रीपासून (२३ मार्च, २०२०) कडक निर्बंध आणि अधिक व्यापक उपाययोजना जाहीर केल्या. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
२) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपासून शहरासह जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी, तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले.
३) संचारबंदीची घोषणा होताच विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी उसळली. २३ मार्चला रात्री ९ वाजल्यानंतर मात्र, रस्ते निर्मनुष्य झाले. ही स्थिती पुढील अनेक दिवस जिल्ह्यात पाहायला मिळाली. शहरात ‘न भूतो’ अशी भयाण शांतता अनुभवास आली.
४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून (२५ मार्च) देशभरात २१ दिवस लाॅकडाऊन लागू केल्याची घोषणा केली.
५) लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला. ज्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोना साथीचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे, अशा ठिकाणांहून प्रवास करून येणाऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली.
६) जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र, मोठे उद्योग, कारखानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वाळूज उद्योगनगरीतील ४ हजार लहान-मोठे कारखाने बंद ठेवण्यात आला. त्याचा उद्योगासह कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला.
७) लाॅकडाऊनमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ ही नवी संकल्पना पुढे आली. अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयीन कामकाज ‘वर्क फ्राॅम हाेम’ने सुरळीत ठेवण्यात आले. वर्षभरानंतर अनेक उद्योग, व्यवसाय याच पद्धतीने कामकाज सुरू ठेवत आहे.
८) कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लाॅकडाऊन पाळताना अनेकांना बेरोजगारी, आर्थिक संकटला सामोरे जावे लागले. रिक्षाचालकांपासून मोलमजुरी करणारे मजूर, कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले, पण अशांसाठी सामाजिक संस्थांसह औरंगाबादकरांनी मदतीचा हात पुढे केला.
९) लाॅकडाऊनमुळे उपासमारीच्या भीतीने उद्योगनगरीत आलेल्या मजुरांनी गावी परतणे सुरू केले. मिळेल तिथंपर्यंत वाहनाने, पायी प्रवास करून कुटुंबासह मजुरांनी स्थलांतर सुरू केले.
१०) मृत्यूचे तांडव काय असते, हे औरंगाबादसह संपूर्ण देशाने ८ मे, २०२० अनुभवले. मध्य प्रदेशकडे रेल्वे रुळावरून पायीच निघालेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना सटाणा (ता. जि. औरंगाबाद) गावाजवळ घडली. या घटनेनंतर मजुरांना गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे साेडण्यात आल्या.
११) राज्य शासनाने १ जून, २०२० रोजी लाॅकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करून विविध सेवा सुरळीत करण्यात आल्या. शहरवासीयांचे जीवन सुरळीत झाले. मात्र, लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनवर आला.