औरंगाबाद : शहरातील सेना आणि भाजपातील काही नेत्यांनी विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले आणि गटबाजीच्या, मतविभाजनाच्या राड्यात पराभूत झालेले नेते राजकारणात जिवंत राहता यावे यासाठी विधान परिषद सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी मुंबई, दिल्ली मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेने उशिरा हजेरी लावली. शिवसेनेच्या ताफ्यात निवडून आलेल्या उमेदवारांऐवजी विधान परिषद सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी मागे-पुढे फिरणारे इच्छुक जास्त होते. सेनेने अजून तरी भाजपाला पाठिंबा देण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही, तर भाजपाचे इच्छुक दिल्लीत मुक्कामी आहेत. विधान परिषद सदस्यपद जर मिळाले नाही तर महामंडळावर वर्णी लागावी, यासाठीही अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेत भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे, आशिष शेलार हे विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. मेटे यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. या चार जागांसाठी निवडणुका होतील. ४शिवसेनेच्या वाट्याला १, भाजपा २, तर काँगे्रस, राष्ट्रवादी मिळून १ जागा कोट्यानुसार येईल. विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य असतात. या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. आणखी दीड वर्षाने काही जागा रिक्त होणार आहेत. त्यावेळी काही नाराजांना संधी देण्याचा विचार होईल, असे पक्षनेते इच्छुकांना सांगत आहेत. ४ जागा ज्या विभागातील आहेत, तेथेच प्रतिनिधित्व दिले गेले तर औरंगाबादमधील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाईल. शिवसेनेकडून माजी आ. प्रदीप जैस्वाल, विकास जैन, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले हे इच्छुक आहेत. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला, तर महामंडळावर वर्णी लागली तरी चालेल, अशीही यातील काहींची अपेक्षा आहे. भाजपाकडून संजय केणेकर यांनी मागणी लावून धरली आहे.पूर्व मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. महामंडळ सदस्य, अध्यक्षपद त्यांना नको आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यामार्फ त केणेकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी महापौर डॉ. भागवत कराड यांचेही प्रयत्न सुरू आहेत.
विधान परिषदेसाठी सर्वांचे लॉबिंग सुरू!
By admin | Updated: November 5, 2014 01:00 IST