हिंगोली : रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांना वाढत्या रिक्त जागांचा फटका सोसत अतिरिक्त कामाचे ओझे पेलावे लागते. सलग दोन शिफ्टही कराव्या लागतात. रिक्त जागा ५0 च्या वर असताना १५ पदांची मंजुरी मागितली गेलीे. तीही पूर्ण होईल, याची शाश्वती नाही. २०० बेडचे रूग्णालयात प्रत्यक्षात ५५ परिचारिकांच्या भरवशावर चालत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार रामभरोसे असल्याने रूग्ण सरळ जिल्हा रूग्णालयात धाव घेतात. संख्या वाढल्याने दर्जा वाढून १०० वरून २०० बेडवर रूग्णालय गेले. त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे जुन्याच १०० बेडवर दीडशेच्यावर रूग्ण अॅडमीट असतात. संख्येने अधिक असणाऱ्या रूग्णांची सेवा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच संख्येतील परिचारिकांना करावी लागते. एकूण सव्वाशेच्या जवळपास पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे कायमस्वरूपी भरण्यात आली आहेत. अन्य १३ परिचारिका कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. प्रामुख्याने सुट्टी, रजा आदी कामांच्या निमित्ताने बहुतांश परिचारिका रजेवर असतात. उर्वरित परिचारिकांमधून तिन्हीही वेळत कर्तव्यावर हजर राहणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते. त्यांना बाह्यरूग्ण विभागासह १७ विभागाचे काम पाहवे लागते. सकाळ, संध्याकाळ डॉक्टरांच्या राऊंडनंतर रूग्णांची पूर्ण काळजी त्यांनाच घ्यावी लागते. साफसफाईपासून ते औषधी देण्यापर्यंतच्या काम करावे लागते. दरम्यान, डॉक्टर नसल्यास नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. बाहेरील लोक वरिष्ठांऐवजी परिचारिकांना जाब विचारतात. विभाग वाढले, बेडची संख्या शंभराहून दोनशेवर गेली. दिवसेंदिवस काम वाढत असताना पुरेशा संख्येअभावी रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. अतिरिक्त ताणामुळे परिचारिकांवर आजारी पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथे परिचारिकांची भरती करणे गरजेचे बनले. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
५५ परिचारिकांवर भार
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST