लातूर : पेट्रोल पंपावरील डिझेल व पेट्रोल विक्रीची रक्कम जमा करण्यासाठी निघालेल्या दोघांवर चाकूहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात स्वस्तिक गॅस एजन्सीचे व्यवस्थापक बस्वराज ठेसे यांचा खून झाला. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असता आरोपीस सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेप, २ हजार रुपये दंड तसेच ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.शहरातील स्वस्तिक गॅस एजन्सीचे व्यवस्थापक बस्वराज ठेसे व त्यांचे सहकारी वैजनाथ कोडे हे दोघे १ मे २०१३ रोजी रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावरील डिझेल व पेट्रोल विक्रीचे ७ लाख २६ हजार ८९१ रूपये स्वस्तीक एजन्सीमध्ये जमा करण्यासाठी शिवाजी चौकातील उड्डाण पुलावरून जात होते. यावेळी त्यांचा तीन आरोपींनी पाठलाग केला. व्यवस्थापक बस्वराज ठेसे व त्यांचे सहकारी वैजनाथ कोडे यांच्यावर चाकूने वार केला व त्यांच्याजवळील बॅग घेवून हल्लेखोर दुचाकीवरून निघून गेले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यवस्थापक ठेसे यांना शहरातील लोकमान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. पुढील उपचारासाठी सोलापूरच्या आश्विनी रुग्णालयात नेले होते. मात्र उपचार चालू असताना ५ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला़ आरोपींवर कलम ३०२, ३९४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आरोपीपैकी परमेश्वर दगडू हानवते यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली़ त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नंबर प्लेटचे तुकडे, पैशाची बॅग असे एकूण २ लाख ३० हजार ६०० रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली़ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. यावेळी आरोपीची ओळख परेड घेण्यात आली़ तसेच फिर्यादी व साक्षीदार परशुराम काळे यांनी पंचासमक्ष त्यांना ओळखले़ यामध्ये सरकारपक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले़ या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड तानाजी एस़भोसले यांनी बाजू मांडली़ त्यांचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस़एस़सापटनेकर यांनी आरोपीस कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व २ हजार रूपये दंड व कलम ३९४ भादंविप्रमाणे आरोपीस पाच वर्षे शिक्षा व २ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे़ या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील तानाजी भोसले यांनी काम पाहिले़ त्यांना अॅड़ प्रदीप पाटील व अॅड. गजानन भोसले यांचे सहकार्य केले. (प्रतिनिधी)
बस्वराज ठेसे खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By admin | Updated: January 6, 2015 01:08 IST