उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्याचे बियाणे खरेदी करुन पेरणीे केली होती. मात्र अनेक ठिकाणी सोयाबिन बियाणांची उगवण झाली नाही. परंडा वगळता इतर सात तालुक्यातून याप्रकरणी दिड हजारावर तक्रारी आल्या असून, यात ३ हजार ९३० एकरवर सोयाबिन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. नगदी पीक म्हणून सोयाबिन पिकाकडे शेतकरी पाहतात. यंदा उशिरा का होईना पेरणी लायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पावसाच्या विलंबनामुळे खरिपातील तूर, उडीद, मूग या पिकांचा कालावधी संपला होता. त्यामुळे यंदा सर्वांनीच सोयाबीनवर भर दिला. निकृष्ट बियाणांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरले, परंतु याच कंपन्याच्या बियाणाने यंदा शेतकऱ्यांना दगा दिला. याअनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामा करण्यात आला होता. तपासणी दरम्यान बहुतांश बियाणे दोषी असल्याचे आढळून आले असल्यामुळे संबधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना पहिल्या नोटीसीव्दारे देण्यात आल्या होत्या. मात्र ३९ पैकी ४ चार कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली असून, उर्वरित कंपन्यांनी अद्याप ही कोणतीच भरपाई दिलेली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबिन उगवले नाही. अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा पंचनामा केल्याचा अहवाल संबधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घेवून सोयाबिन न उगवल्याची तक्रार ग्राहकमंचात करावी असा सल्ला कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उमेश बिराजदार यांनी दिला असून, दोषी कंपन्याविरुध्द कायदेशिर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कंपन्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू
By admin | Updated: August 26, 2014 00:25 IST