’बाळासाहेब जाधव , लातूरएस.टी. महामंडळाच्या वतीने एस.टी.च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा अभियानासह दिवाळीनिमित्त जादा गाड्यांची सोय करून एस.टी.च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून एकादशी ते नवमी या १४ दिवसांच्या कालावधीत लातूर विभागाला ८ कोटी २४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.बहुजन हिताय, बहुजन सुखाय... या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने विभाग नियंत्रक डी.बी. माने यांच्या मार्गदर्र्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान, सुरक्षित व सुखकर प्रवासाची हमी व महत्वपूर्ण सणानिमित्त जादा गाड्यांची सोय प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये आषाढी एकादशी, गणेशोत्सव, कपिलधार यात्रा, दिवाळी या कालावधीत जादा गाड्यांची सोय लातूर विभागाच्या वतीने केली जाते. याच धर्तीवर एकादशी ते नवमी या १४ दिवसांच्या कालावधीत जादा बसेसची सोय करण्यात आली. उदगीर आगाराच्या माध्यमातून दिवाळीच्या कालावधीत ७ लाख ९ हजार किलोमीटर्सच्या माध्यमातून २ कोटी १८ लाखांचे उत्पन्न मिळाले. उदगीर आगारातून ६ लाख १७ हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी ९३ लाख, अहमदपूर आगारातून ४ लाख ८० हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी ४६ लाख, निलंगा आगाराच्या माध्यमातून ४ लाख ६१ हजार किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण करून १ कोटी ४५ लाख, औसा आगाराच्या माध्यमातून ४ लाख ४ हजार किलोमीटर्सच्या प्रवासातून १ कोटी २२ लाख, लातूर आगाराच्या माध्यमातून ७ लाख ९ हजार किलोमीटर्सच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी लातूर विभागातून दिवाळीच्या कालावधीत २५ लाख २५ हजार कि.मी.च्या माध्यमातून ७ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर २०१४ या चालू वर्षाच्या कालावधीत २६ लाख ५६ हजार कि.मी.च्या माध्यमातून लातूर विभागाला ८ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा यंदा ७८ लाखांचे उत्पन्न जास्त झाले आहे.एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने दीपावलीच्या कालावधीत गतवर्षी २६ आॅक्टोबर रोजी २५ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून ५५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये मिळालेल्या उत्पन्नामुळे एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या उत्साहात वाढ झाल्याने यावर्षी २६ आॅक्टोबर रोजी ४० बसेसची सोय करण्यात आली. यातून ६७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न पुणे येथे सुरू करण्यात आलेल्या जादा बसेसच्या माध्यमातून मिळाले आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधार यात्रेस बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेला लातूरहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एस.टी. महामंडळाच्या वतीने कपिलधार यात्रेसाठी लातूर-१०, उदगीर-८, अहमदपूर-८, निलंगा-६, औसा-७ अशा एकूण ४० बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केली जात असल्याचे विभाग नियंत्रक डी.बी. माने म्हणाले.